कराडकरांचे नगरपालिकेत धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराड नगरपालिकेने 24 बाय 7 योजनेअंतर्गत सर्व नागरिकांकडून अडीच हजार रुपये शुल्क घेऊन पाण्याचे मीटर बसविले; परंतु ही योजना सुरू झालीच नाही. पाणीपुरवठा करताना पाण्याचे व्हॉल्व फिरविले जातात, त्यावेळी हवेच्या प्रेशरने मीटर फिरले जातात व त्यानंतर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ही पाणीपट्टी नसून, ‘हवापट्टी’ आहे. त्यामुळे अवाजवी बिले येणारी हवापट्टी रद्द करून मीटरची पाणीपुरवठा योजना रद्द करावी, अशी मागणी करीत नागरिकांनी मंगळवारी (दि. 24) नगरपालिका आवारात एकदिवसीय धरणे आंदोलन केले.

यावेळी नगरपालिकेचे अभियंता ए. आर. पवार यांना नागरिकांनी मागणीचे निवेदन दिले. या आंदोलनात आनंदराव लादे, रमेश वायदंडे, राजेश पवार, झाकीर पठाण, इब्राहिम मुल्ला, सचिन आढाव, आदी नागरिकांसह महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.

निवेदनात म्हटले आहे, ‘यापूर्वी कराड नगरपरिषद वार्षिक पाणीपट्टी ही दीड ते दोन हजार रुपये घेत होती. आता ती बंद करून मीटरप्रमाणे तीन महिन्यांची पाणीपट्टी आकारणी सुरू केली आहे. सर्वसाधारण दीड हजार रुपये इतकी, तर त्याहून अधिकसुद्धा पाणीपट्टी आकारत आहे.

सध्या नगरपालिकेने अवाजवी हवेच्या रीडिंगसह घरोघरी जाऊन पाणी बिल देऊन भरण्यास सक्ती करीत आहेत. बिल न भरल्यास दोन टक्के व्याज आकारणार आहेत. त्यामुळे नागरिकांची ‘हवापट्टी’ वसुलीअंतर्गत लूट होत आहे. त्यामुळे जोपर्यंत मलकापूर नगरपालिकेप्रमाणे पाणीपुरवठा कराड शहरात केला जात नाही. तोपर्यंत मीटरची पाणीपुरवठा योजना बंद करुन पूर्वीप्रमाणे प्रतिनळ कनेक्शन दोन हजार रुपयप्रमाणे पाणीपट्टी आकारावी.