
>>भास्करराव आर्वीकर
नितीन कंधारकर यांचे ‘गोल्डन मेमरीज’ हे वैयक्तिक आठवणीचे चारशे पानी पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. कंधारकर हे बांधकाम व्यावसायिक असूनही संवेदनशील मन जपलेला एक लेखक लिखाणातून अनुभवास येतो. कविता, उपरोधिक, अप्रकाशित लिखाण त्यांनी पुष्कळ केले आहे. आठवणीचे हे पुस्तक त्यांची पहिलीच साहित्यकृती आहे.
आत्मकथनपर लिखाण करणे सोपे नाही. आपणच घेतलेले अनुभव लिहायचे असले तरी ते वाचकांना भावले पाहिजेत. आत्मकथनात प्रसंगाची आणि अनुभवाची निवड करणे हे अवघड काम असते आणि तेथेच त्याचा कस लागतो. त्या दृष्टीने कंधारकर यांनी हे लिखाण करून बाजी मारली आहे. मी एक किस्सा सांगतो असे कुणी म्हटले की, समोरची मंडळी कान टवकारून ऐकू लागतात. कारण अशा किश्श्यांच्या मागे रोचक, रंजक अनुभव ऐकायला मिळणार, अशी अपेक्षा असते. चुटका जितका चांगला घडावा लागतो त्यापेक्षा तो चांगल्या प्रकारे सांगताही यावा लागतो.
जीवनातील प्रत्यक्ष अनुभवलेल्या गोष्टी सर्वांनाच आवडतात. या वाचकांचे अनुभव विश्व समृद्ध करत असतात. मराठी मुलखातील काही भाग फार कमी प्रमाणात वर्णिला जातो. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील भागातील समाजजीवन, भाषा, सांस्कृतिक वैशिष्टय़े साहित्यात कमी दिसतात. नितीन कंधारकरच्या या आठवणी त्या दृष्टीने वेगळेपण जपतात. या पुस्तकात उमरगा परिसरातील हैदराबाद मुक्तिसंग्राम त्यावेळचे लोकजीवन घराण्यातील सण, उत्सव, शाळा, महाविद्यालय, शेतातील गोष्टी, मनोरंजक पद्धतीने त्यांच्या लिखाणातून प्रगट झाल्या आहेत. कर्नाटकाच्या जीवनाचा आणि भाषेचा मराठी मुलखावर प्रभाव यात जाणवतो. वेण अमावास्या व इतर सणांचे अनुभव वाचकांना नव्या भावविश्वात घेऊन जातात. त्या भागातील सामाजिक इतिहास, चालीरीती, जीवनाचे पैलू यांचे अतिशय सुंदर वर्णन या पुस्तकात पानोपानी आले आहे. त्यांच्या लिखाणात आलेल्या अनेक गोष्टी नवजीवनातून हद्दपार झाल्या आहेत. त्यामुळे भावी पिढीसाठी एक अमूल्य ठेवा ठरावा, असे हे लिखाण आहे. आत्मकथन करताना आत्मप्रौढीचा दोष न येता सहजपणे दिसावा लागतो. अनेक आठवणी सांगताना स्वतःची प्रतिमा सांभाळण्याचा किंवा ती उदात्त करण्याचा मोह कोठेही लेखकांनी घेतला नाही.
हे आत्मकथन केवळ लेखकाचे नाही तर तत्कालीन सर्व समाजघटकाचे आहे, असे वाचत असताना जाणवते. म्हणाल तर हे आठवणीच्या रूपात शब्दचित्रांनी प्रगट केलेले हे कथन आहे. जे साठवले ते प्रगट व्हावे हा संकेत या लिखाणामागे दिसतो. या पुस्तकाची भाषा त्या परिसराची प्रतिनिधित्व करणारी आहे. अनुभवातील अस्सलपणा हरवत चालला असताना हे लिखाण वाचकांना भुरळ पाडेल असेच आहे. पुस्तकातील आठवणी मोजक्या शब्दांत, खुमासदारपणे केल्याबद्दल नितीन कंधारकरांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!
गोल्डन मेमरीज
लेखक – नितीन कंधारकर
प्रकाशक – शांभवी प्रिंटर्स आणि पब्लिशर्स
पृष्ठ – 400, मूल्य – रुपये 450/-




























































