
कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणात खंड पडू नये यासाठी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल्स ट्रस्टीज असोसिएशनने (मेस्टा) पुढाकार घेतला आहे. कोरोनाकाळात अनाथ झालेल्या 450 विद्यार्थ्यांना ‘मेस्टा’च्या वतीने मोफत शिक्षण दिले जाणार आहे.
कोरोनाची लागण झालेल्या अनेक पालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही विद्यार्थ्यांचे आईवडील दोघेही कोरोनाचे बळी पडले, तर काही विद्यार्थ्यांच्या डोक्यावर वडिलांचे छत्र राहिलेले नाही. एकटय़ा आईला मुलांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आली आहे, अशा विद्यार्थ्यांना ‘मेस्टा’चे संस्थापक संचालक संजय तायडे-पाटील यांनी मदतीचा हात दिला आहे. घरातील कमावती व्यक्तीच सोडून गेल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा सुमारे 450 विद्यार्थ्यांनी ‘मेस्टा’कडे नोंदणी केली असून या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च ‘मेस्टा’च्या वतीने केला जाईल, असे संजय तायडे पाटील यांनी स्पष्ट केले. शिकण्याची इच्छा असलेल्या आणि पालकांचे छत्र गमावलेल्या विद्यार्थ्यांनी ‘मेस्टा’कडे संपर्क साधल्यास संस्थेच्या वतीने अशा विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही तायडे-पाटील म्हणाले.





























































