5 हजार 354 भाग्यवंतांची दिवाळी झाली गोड; कोकण म्हाडाची लॉटरी फुटली, हक्काच्या घराचे स्वप्न साकार

कोकण म्हाडाने गेल्या तीन महिन्यांपूर्वी घोषणा केलेल्या गृहनिर्माण योजनेची सोडत ठाणे शहरातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात निघाली आणि ५ हजार ३५४ भाग्यवंतांची दिवाळी गोड झाली. या भाग्यवंतांचे ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतील घरांचे स्वप्न साकार झाले. आज सोडत निघणार असल्यामुळे सकाळी दहापासून घाणेकर नाट्यगृहाच्या दिशेने अर्जदारांची रिघ लागली होती. ११ वाजता संपूर्ण सभागृह गर्दीन तुडुंब भरून गेले. मात्र नेते उशिरा आल्याने ही सोडत सुमारे दोन तास उशिराने काढण्यात आली. सभागृहात उपस्थित असलेल्या अनेक अर्जदारांच्या मोबाईलवर विजेता असल्याचे मेसेज झळकल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ५ हजार ३५४ घरे आणि ओरोस, कुळगाव येथील ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी कोकण म्हाडाने जून महिन्यात विशेष योजना जाहीर केली होती. या सोडतीमध्ये सहभागी होण्यासाठी १४ जुलैपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली होती. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागल्यामुळे दोन वेळा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली. या घरांसाठी एकूण १ लाख ५८ हजार ४२४ अर्ज आले होते. त्यापैकी १ लाख ४६ हजार ४३२ अर्ज हे २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांसाठी होते. या घरांची सोडत आज घाणेकर नाट्यगृहात काढण्यात आली. या सोडतीसाठी अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेते उशिरा आल्यामुळे सोडत सकाळी ११ ऐवजी दुपारी १ वाजता काढण्यात आली. त्यामुळे अर्जदारांना दोन तास ताटकळत थांबावे लागले.

ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या प्रयत्नांना यश

कोलशेत येथील आशर गृहसंकुलामध्ये असलेली ५६ घरे पत्रकारांसाठी राखीव ठेवण्याची मागणी ठाणे जिल्हा पत्रकार संघाने केली होती. या घरांची लॉटरी आज काढण्यात आली. त्यामुळे अनेक पत्रकारांच्या घराचे स्वप्न साकार झाले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी याप्रसंगी म्हाडाचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल यांचे अभार मानले. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, रेवती गायकर आदी उपस्थित होते.

मुंबईत पाच वर्षांत निघणार दोन लाख घरांची लॉटरी

म्हाडाने गेल्या ११ वर्षांत मोठ्या प्रमाणात घरांची सोडत काढली आहे. एमएमआरडीए क्षेत्रातही हजारो घरे गरजू कुटुंबांना उपलब्ध करून दिली आहेत. मुंबईमध्ये धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आणि एसआरए योजनेमुळे पुढील पाच वर्षांत म्हाडाकडे लॉटरीसाठी सुमारे दोन लाख घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडा कोकण मंडळाच्या वतीने लाखो घरांची निर्मिती करण्यात येणार आहे, असे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.