
म्हाडाने गिरणी कामगारांसाठी 1 मार्च 2020 रोजी काढलेल्या सदनिका सोडतीत विजेते ठरलेल्या, पण अद्याप कागदपत्र सादर करू न शकलेल्या कामगारांना आणि त्यांच्या वारसांना खूशखबर आहे. कागदपत्र सादर करण्याची मुदत 9 सप्टेंबर होती. ती संपल्याने आता आपण कशी कागदपत्र सादर करणार असा प्रश्न विजेत्या गिरणी कामगारांसमोर उभा राहिला होता. मात्र म्हाडाने राज्यातील कोरोना आणि पूरस्थितीचा विचार करून विजेत्यांना आपली कागदपत्र सादर करण्यासाठी 30 दिवसांची अंतिम मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे संबंधितांना आता 9 ऑक्टोबरपर्यंत आपली कागदपत्र सादर करता येणार आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने गिरणी कामगार सदनिका सोडतीतील विजेते गिरणी कामगार, वारसांना प्रथम सूचना पत्र पाठवत 12 जुलै ते 9 सप्टेंबर 2021 पर्यंत आपली सर्व कागदपत्र मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत सादर करण्यास सांगितले होते, मात्र बहुतांश गिरणी कामगार किंवा वारसांनी सदरच्या कालावधीत मुंबई बँकेत कागदपत्र सादर केलेले नाहीत. तसेच सदर सोडतीमधील काही यशस्वी गिरणी कामगार, वारसांना पाठवलेली प्रथम सूचना पत्र विविध कारणांमुळे पोस्टाकडून परत आलेली आहेत. पोस्टाकडून परत आलेल्या प्रथम सूचना पत्रांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
म्हाडाच्या गिरणी कामगार कक्षात प्रथम सूचना पत्र मिळणार
सोडतीमधील ज्या यशस्वी गिरणी कामगारांची प्रथम सूचना पत्र विविध कारणांमुळे पोस्टाकडून परत आलेली आहेत ती प्रथम सूचना पत्र संबंधितांना मुंबईतील वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील उपमुख्य अधिकारी, गिरणी कामगार कक्ष, मुंबई मंडळ या कार्यालयातून मिळणार आहेत. त्यामुळे सदरची प्रथम सूचना पत्र संबंधितांनी स्वीकारून आपल्या इतर कागदपत्रांसह मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 9 ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन मुंबई मंडळाने केले आहे.


























































