
पात्र नसलेल्यांना घराचे वाटप केल्याचा आरोप असलेल्या म्हाडा अधिकाऱयाला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
विजयसिंग ठाकूर असे या म्हाडा अधिकाऱयाचे नाव आहे. तो असिस्टंट इस्टेट मॅनेजर म्हणून काम करतो. अरिस्टो योजनेअंतर्गत घराचे वाटप करताना पात्र नसलेल्यांनाही अलॉटमेंट लेटर देण्यात आले. पुणे देहूरोड पोलीस ठाण्यात याचा गुन्हा नोंदवण्यात आला. यात होणारी अटक टाळण्यासाठी ठाकूरने याचिका केली होती.
न्या. अश्विन भोबे यांच्या सुट्टीकालिन एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मी नियमानुसार अलाटमेंट लेटर जारी केले आहे. मी तपासात सहकार्य करायला तयार आहे. मला अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी विनंती ठाकूरने केली. ती मान्य करत न्यायालयाने ठाकूरला 25 हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही
1987 पासून ठाकूर सरकारी सेवेत आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, असेही न्यायालयाने जामीन देताना नमूद केले.