म्हाडाच्या घरांसाठी अपात्र गिरणी कामगारांना दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करता येणार

म्हाडाच्या घरांसाठी अपात्र ठरलेल्या गिरणी कामगार आणि वारसांना आता कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत विशेष मुदत देण्यात आली आहे. याबाबतचे निर्देश आज कामगार उप आयुक्तांनी म्हाडाला दिले आहेत. या निर्णयामुळे सुमारे 7 हजारांहून अधिक अपात्र गिरणी कामगारांना दिलासा मिळणार आहे.

बृहन्मुंबईतील 58 बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीपृत व यापूर्वी झालेल्या सोडतीत यशस्वी न झालेल्या दीड लाख गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’ ने अभियान सुरु केले होते. त्याअंतर्गत 1 लाख 8 हजार 550 अर्जदारांनी अर्ज केले असून त्यातील जवळपास 99 हजार 937 अर्जदार पात्र ठरले आहेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्यासाठी गिरणी कामगार आणि वारसांना मुदत दिली होती. काही कामगारांनी वाढीव मुदतीत देखील कागदपत्रे सादर केली नाहीत. अशा गिरणी कामगारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी विशेष संधी मिळावी अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघ तसेच गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संघटनेने केली होती.

पोर्टलमध्ये आवश्यक बदल करा

ज्या गिरणी कामगारांना दिलेल्या कालावधीत कागदपत्रे अपलोड करता आली नाहीत अशा गिरणी कामगार, वारसांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत विशेष संधी द्यावी व त्याअनुषंगाने पोर्टलमध्ये बदल करावेत, असे आदेश कामगार उप आयुक्तांनी म्हाडाला दिले आहेत. विशेष मुदतीची माहिती संबंधित गिरणी कामगार आणि वारसांना एसएमएसद्वारे कळविण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत.