घातक हत्यारांसह दहशत माजविणाऱ्या आरोपींची धिंड, म्हसवडमधील गरुड कोयता गँगला दणका

सोशल मीडियावर प्रक्षोभक गाण्यांचे हत्यारांसह व्हिडीओ व्हायरल करून दहशत माजविणाऱया गरुड कोयता गँगमधील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी या आरोपींची दहशत निर्माण केलेल्या भागातून धिंडही काढली. उत्कर्ष भागवत जानकर, सिद्धार्थ किरण रावळ, शंतनू विकास शिलवंत, आर्यन राहुल सरतापे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पळसावडे व म्हसवड येथील गरुड गँगमधील मुले सोशल मीडियावर हत्यारांसह व्हिडीओ व्हायरल करून त्यावर ‘नायक नही खलनायक हूँ मैं’ अशी प्रक्षोभक गाणी लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना मिळाली. याची दखल घेत गुन्हे प्रकटीकरणच्या पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी म्हसवड, पळसावडे परिसरात धाव घेतली. यावेळी आरोपी दुचाकीला घातक हत्यारे लावून दहशत निर्माण करीत असल्याचे दिसले. पोलिसांनी या आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे तलवारी, कोयते यांसारखी घातक हत्यारे आढळली. म्हसवड नगरपरिषद निवडणूक 2025च्या अनुषंगाने ही मोठी कारवाई समजली जात आहे. या कारवाईमुळे गरुड गँगचा बीमोड करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, मैना हांगे, रूपाली फडतरे, अमर नारनवर, जगन्नाथ लुबाळ, अभिजित भादुले, नवनाथ शिरकुळे, राहुल थोरात, संतोष काळे, धीरज कवडे, सतीश जाधव, हर्षदा गडदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.