
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर उपचारांच्या सोयीअभावी अपघातांचे आणि त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण 26 टक्क्यांनी वाढले असून ते रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली.
समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वात आधुनिक महामार्ग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्या महामार्गावर इतक्या मोठय़ा प्रमाणात अपघात होणे ही धक्कादायक बाब असल्याचे नार्वेकर म्हणाले. समृद्धी महामार्गावर 17 ट्रॉमा केअर उभारणार असे सांगितले होते. त्यातील किती उभारली गेली, एअर ऍम्ब्युलन्सच्या अंमलबजावणीचे काय झाले, असे प्रश्न आमदार नार्वेकर यांनी उपस्थित केले. पुणे-मुंबई महामार्गावर खालापूरजवळ एअर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था केली गेली आहे, तशी समृद्धीवरही केली गेली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
उपचारासाठी 14 रुग्णालयांशी करार
अपघातांची कारणे हा रस्ता नसून चालकांच्या चुकीमुळे अपघात झाले आहेत. शासन या महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर्स उभारणार आहेच; पण अपघातातील जखमींना तातडीचे उपचार वेळेवर उपलब्ध व्हावेत म्हणून मुंबई ते नागपूरपर्यंतच्या 14 रुग्णालयांबरोबर करार केला आहे अशी माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली.

























































