
जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय मागे घेतल्यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना डोक्यावर घेऊन उन्माद केला. यावेळी कोरोनाचे नियम पायदळी तुडवून जल्लोष करण्यात आला. मास्क न घालून खुद्द इम्तियाज जलील यांनीही नियम मोडला. या प्रकरणी खासदार जलील यांच्यासह 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजीनगर जिल्हय़ात कोरोनाची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. घराघरात कोरोनाची बाधा झाली आहे. अगदी चिमुकल्यापासून ते वृद्धांपर्यंत संसर्ग पसरला आहे. वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपासून लॉकडाऊन घोषित केला होता. मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या लॉकडाऊनला कडाडून विरोध केला. लॉकडाऊन लावल्यास त्याविरोधात आपण मोर्चा काढू अशी धमकीही त्यांनी दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने अचानक लॉकडाऊनचे नियम बदलण्यात आल्याचे कारण सांगून 31 पासून लावण्यात येणारा लॉकडाऊन पुढील सुचनेपर्यंत रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
लॉकडाऊन रद्द झाल्याचे कळताच खासदार इम्तियाज जलील यांच्या एन 12 भागातील बंगल्यासमोर एमआयएमचे कार्यकर्ते गोळा झाले. या कार्यकर्त्यांनी खासदार जलील यांना डोक्यावर घेऊन नारेबाजी केली. या कार्यकर्त्यांनी मास्क घातले नव्हते. सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर बसवण्यात आली. रात्रीची संचारबंदी मोडून हा उन्माद करण्यात आला. या प्रकरणी गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षक विजय पवार यांच्या फिर्यादीवरून खासदार इम्तियाज जलील यांच्यासह माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, विकास एडके, नाईवाडे ऊर्फ अज्जू आदी 30 जणांविरोधात भादंवि कलम 143, 188, 269 व 270 सह कलम 11 महाराष्ट्र कोविड-19 विनियमन 2020 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


































































