
आगामी मनपा आणि नगरपालिका निवडणुकाच्या पाशर्वभूमिवर एमआयएमने नौटंकीला सुरुवात केली आहे. मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जागांबाबत तातडीने विधी मंडळात निर्णय घेतल्यास एम.आय.एम. आगामी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका लढविणार नाही. मात्र, तसे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तीयाज जलील यांनी आज एका पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात दिलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, वक्फ बोर्डाच्या मालमत्ता मुस्लिमांना परत देण्यात याव्यात याकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार जलील यांच्या नेतृत्वाखाली एम.आय.एम.ने शनिवारी संभाजीनगरातून मुंबईला वाहनाने तिरंगा यात्रा काढली होती. या निमित्ताने आज खासदार जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन लक्ष वेधले. या पत्रकार परिषदेस डॉ. गफार कादरी, जिल्हाध्यक्ष समीर खान यांची उपस्थिती होती.



























































