
शहरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. या दोघांकडून तब्बल 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांना अटक केली आहे. गांधी चौक पोलिसांनी मारुती मंदिर ते हॉटेल पालवी या रस्त्यावर ही कारवाई केली.
मौला हसन टेमकर (वय 38, रा. रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज) व गणेश नागाप्पा शिंदे (वय 29, रा. असर रोड, हुबळी (जुनी) कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मौला टिमकर हा मिरज येथील मारुती मंदिर ते हॉटेल पालवीजवळ ऍक्टिवा मोटारसायकल घेऊन भारत सूतगिरणीकडे गांजा विक्री करण्यासाठी जाणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौकी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या मार्गावर सापळा लावला. काही वेळानंतर ऍक्टिवावरून दोन इसम जात असताना होमगार्ड कार्यालयासमोर पोलिसांनी त्यांना पकडले. मौला हसन टेमकर व गणेश नागाप्पा शिंदे अशी दोघांची नावे त्यांनी सांगितली.
दोघांची झडती घेतली असता, डिकीमध्ये एक पिशवी सापडली. या पिशवीत गांजा असल्याचे आढळून आले. पिशवीमध्ये 3 किलो 879 ग्रॅम वजनाचा 23 हजार 274 रुपयांचा गांजा तसेच 20 हजार रुपये किमतीची दुचाकी व 540 रुपये रोख रक्कम, 8 हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल तसेच 10 हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 61 हजार 814 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोघांच्या विरोधात गांधी चौकी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, सोमनाथ कचरे, प्रमोद खाडे, सुभाष पाटील, चंद्रकांत गायकवाड, सुरज पाटील, अमोल आवळे, संतोष माळी, प्रवीण हुक्कीरे, विकास कांबळे यांनी सहभाग घेतला.
























































