
हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना 20 लाख रुपयांचे बक्षीस देईन, असं वादग्रस्त विधान हरिद्वारच्या श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी वैरागानंद गिरी महाराज (धर्मगुरु मिर्ची बाबा) यांनी केले आहे.
काली माँ चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरवरून मिर्ची बाबांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. “अशा कृत्यांमुळे हिंदू धर्माला बदनाम करण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. माँ कालीचा अपमान होत आहे. असे चित्रपट बनवणाऱ्यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना मी 20 लाख रुपये देईन, असे व्हिडिओत म्हटले आहे.
या व्हिडीओत ते म्हणाले की, हे सगळं एक षडयंत्र आहे. त्यांचा शिरच्छेद झाल्याशिवाय हे बंद होणार नाही. अशा लोकांद्वारे हिंदू धर्माला बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे. मां कालीला अपमानित केलं जात आहे. निरंजनी आखाड्याचा संत म्हणून मी घोषणा करत आहे की असे चित्रपट बनवणाऱ्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला मी 20 लाख देईन, अशी घोषणा मिर्ची बाबा यांनी केली आहे. या विधानामुळे नवीन वाद उफाळण्याची शक्यता आहे.
चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर वादाला तोंड फुटले. पोस्टरमध्ये देवी कालीच्या वेशभूषेत एका महिलेचे चित्रण करण्यात आले आहे. फोटोत ती सिगारेट ओढताना दिसत आहे. तिच्या नेहमीच्या त्रिशूल (त्रिशूल) आणि विळा या वेशभूषेसोबत, देवीची भूमिका करणारी अभिनेत्री LGBTQ+ समुदायाचा झेंडा फडकवताना दाखवली आहे.
























































