
जयगड समुद्रात बुडालेल्या नावेद 2 या मच्छिमार नौकेचा अद्यापही शोध लागलेला नाही. समुद्रात बुडालेल्या नौकेचा एकही अवशेष अद्याप सापडला नसल्याने अजूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या नौकेवर सहा खलाशी होते. त्यातील पाचजण अद्यापही बेपत्ताच आहेत. त्यामुळे जयगड समुद्रात बुडालेल्या या नौकेची शोधमोहिम नक्की कुठे भरकटलेय असा सवाल उपस्थित होत आहे. समुद्रात बुडालेली नौका 25 दिवस उलटले तरी सापडलेली नाही. नौकेचा अद्याप शोध न लागल्यामुळे 19 नोव्हेंबर रोजी जयगड मच्छिमार संस्था कार्यालयात मच्छिमारांची बैठक होणार असून या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
26 ऑक्टोबर रोजी नावेद 2 ही नौका अचानक बेपत्ता झाली. या नौकेचा समुद्रात अपघात झाल्याचा अंदाज मच्छिमारांनी व्यक्त केला. एखाद्या मालवाहू जहाजाने नौकेला धडक दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शक्यतेनुसार जिंदलच्या बंदरावर आलेल्या मालवाहू जहाजांची चौकशी महत्वाची ठरणार आहे. जीपीएस यंत्रणा या शोधकार्यात पोलिसांना महत्वपूर्ण मदत करू शकते. पोलिसांनी ही यंत्रणा ताब्यात घेतली आहे. मात्र या शोधमोहिमेचे पुढे काय झाले, बेपत्ता नौकचे काय झाले हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
नौकेवरील एका खलाशाचा मृतदेह सापडला असला तरी अद्याप पाचजण बेपत्ता आहेत. 25 दिवस उलटले तरी मच्छिमार नौकेचा शोध न लागल्यामळे नौका आणि नौकेवरील खलाशांना न्याय मिळणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. वादळ, वारे नसताना अचानक समुद्रातून गायब झाली आहे. मच्छिमारांना न्याय मिळण्यासाठी स्थानिक मच्छिमार आंदोलनाच्या पवित्र्यात असून 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जयगड मच्छिमार संस्था कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा ठरणार आहे.




























































