
भंडारा जिल्हा नियोजनाच्या निधी वाटपात महायुती सरकारकडून विरोधकांबाबत दुजाभाव केला जात असल्याचे सातत्याने उघडकीस येत आहे. याच मुद्दय़ावरून अकोल्यानंतर आज भंडारा येथे जिल्हा नियोजन समिती बैठकीत राडा झाला. मुजोर सत्ताधाऱयांकडून विरोधकांचा मोबाईल हिसकावून घेण्यापर्यंत मजल गेली. यावरून विरोधी पक्षाचे आमदार-खासदार आक्रमक झाले आणि सत्ताधाऱयांवर तुटून पडले.
भंडारा नियोजन भवनमध्ये जिह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे आमदार नाना पटोले, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, खासदार प्रशांत पडोळे, भाजप आमदार परिणय फुके, मिंधे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके हे उपस्थित होते.
बैठक सुरू असतानाच निधी वाटपातील भेदभावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तानातानी झाली. त्याचे व्हिडीओ चित्रण करणाऱ्या खासदार पडोळे यांच्या सोशल मीडिया कर्मचाऱ्याच्या हातातील मोबाईल पह्न हिसकावून त्याला बैठकीबाहेर काढण्यात आले. त्यामुळे काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्ते संतापले. या प्रकारामुळे बैठकीत प्रचंड गोंधळ झाला होता. पालकमंत्री सावकारे यांनी मात्र असे काहीही घडले नसल्याचा आव बैठकीनंतर आणला.