
सामना प्रतिनिधी । कर्जत
बालहट्ट पुरविण्यासाठी खेळण्यातील गाडी दिली जाते, मात्र येथे खासदारकी पाहिजे असा वेगळाच हट्ट होत आहे. पण त्यासाठी काँग्रेस पक्ष आणि आघाडीला अडचणीत आणणे चुकीचे आहे, असा टोला काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना लगावला.
कर्जत येथील भाग्यतारा मंगल कार्यालय येथे काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षाने विखे यांना मंत्री केले, विरोधी पक्षनेतेपद मागितले तेही दिले. दोन वेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. आणखी काय द्यावयाचे राहिले होते. मात्र यांनी बालहट्टापायी पोरखेळ केला आहे. आमच्यावरील संकट आता तुमच्या गावागावात येणार आहे. ते एकजुटीने परत पाठवा अन्यथा निमंत्रण देऊन संकट ओढवून घेतले तर त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. हे सुरुवातीला काही म्हणत नाहीत, मात्र नंतर प्रत्येक गावामध्ये त्यांचा गट करतात असा टोला त्यांनी लगावला.






























































