आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार, उद्योजक चंद्रकांत जाधव (59) यांचे आज निधन झाले. हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी अंत्ययात्रा काढून रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

एक यशस्वी उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि फुटबॉल खेळावर निस्सीम प्रेम अशी त्यांची जिह्यामध्ये ओळख होती. येथील तालीम मंडळांचे ते हितचिंतक होते. सर्वच पक्षांतील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँगेसच्या चिन्हावर ते विजयी झाले. त्यांनी तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर फुप्फुसाला संसर्ग झाल्याने स्थानिक रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास झाल्याने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान रक्तदाब कमी झाल्याने आज पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पुत्र सत्यजित, मुलगी अस्मिता मोरे, आई प्रमिला जाधव असा परिवार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

‘आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘मूळचे खेळाडू असलेल्या आमदार जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्ये उद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला. विधिमंडळातील एका उमद्या सहकाऱयाचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’