आमदार विकास निधी झाला 3 कोटी, दहा वर्षांनंतर एक कोटीची दिली वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटीची वाढ करण्यात आली आहे. आमदारांना प्रतिवर्षी स्थानिक विकास निधीअंतर्गत आता तीन कोटी रुपये मिळणार आहेत. वर्ष 2011-12 पासून प्रतिवर्षी प्रत्येक आमदारांस दोन कोटी विकास निधी प्राप्त होत होता. दहा वर्षांत एक कोटींच्या निधीची वाढ करण्यात आली आहे. विधान परिषदेचे 78 आणि विधानसभेचे 288 आमदार राज्य विधिमंडळात आहेत. त्यांना स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी 2 कोटी रुपये निधी दिला जात होता. अलिकडच्या काळात बांधकाम साहित्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विकास निधीत वाढ करण्याची मागणी आमदार सातत्याने करत होते. वर्ष 2020-21च्या अर्थसंकल्पात आमदार निधीत एक कोटी वाढ करण्याची घोषणा झाली होती. मात्र तो वाढीव निधी प्राप्त झाला नव्हता. मंगळवारी नियोजन विभागाने त्यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. 2020-21 पासून प्रत्येक आमदारांस प्रतिवर्ष 3 कोटी रुपये विकास निधी प्राप्त होण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचे या निर्णयात म्हटले आहे. त्याचप्रमाणे यंदाचा हा तीन कोटींचा निधी मार्चनंतर लॅप्स होणार नसून पुढील वर्षीही वापरता येणार आहे.