आमदार नागेश पाटील आष्टीकरांनी प्रशासनाला न जुमानता कालव्याचे उघडले दरवाजे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हदगांव

हदगाव, हिमायतनगर तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. तसेच रब्बी पिकासाठी पाण्याची गरज असताना जलसंपदा विभाग कालव्यातून पाणी सोडण्यास तारीख पे तारीख देत असल्याने जलसंपदा विभागाविरोधात एल्गार पुकारून आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज थेट मुख्य कालव्यावर जाऊन स्वत: गेट उघडले. त्यामुळे कयाधू शाखा कालव्याद्वारे हदगांव हिमायतनगर तालुक्यात दोन दिवसात पाणी पोहचणार आहे.

हदगांव व हिमायतनगर तालुक्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवर ईसापूर येथे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प ऊभारल्यामुळे पैनगंगेचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला. तसेच या धरणातील पाणी सुद्धा या परिसरातील शेतकर्‍यांना देण्याला प्राधान्य देण्याऐवजी थेट धर्माबाद, ऊमरी, मुदखेड या तालुक्यांना प्राधान्याने पाणी पुरवण्याचा निर्णय राज्याच्या जलसंपदा विभागाने घेतल्यामुळे हदगांव व हिमायतनगर तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये असंतोष धुमसत होता. रब्बी पिकांच्या पेरणी करण्याचा कालावधी संपत आला तरी व्यवस्थापन पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे शेवटी शेतकर्‍यांच्या सहभागाने आमदार आष्टीकरांनीच कालव्याचे गेट काढून हदगांव मतदार संघातील शेतकर्‍यांना पाणी सोडले.

जलसंपदा विभागाने  ५ नोव्हेंबरपासून कयाधू शाखा कालव्यास पाणी सोडण्यात येईल असे वेळापत्रकही जाहीर केले होते. तरीही वेळेत पाणी न सोडता ११ नोव्हेंबरला मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतू कयाधू शाखा कालव्याला सोडलेच नाही. या विषयी आ. आष्टीकरांनी संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारला असता त्यांनी दि २७ रोजी कयाधू शाखा कालव्याला पाणी सोडण्यात येईल असे उत्तर त्यांनी दिले. ही बाब शेतकर्‍यांना समजताच शेतकर्‍यांनी आ. आष्टीकर यांना पर्याय शोधण्याचा आग्रह केला. मंत्र्यानी तर ५ नोव्हेंबर सांगितले व अधिकारी म्हणतात २७ नोव्हेंबर यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांचे नेतृत्व आ. आष्टीकरांनी करत स्वत:च पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी सकाळी ११ वाजता आमगव्हाण येथे सहा-सातशे शेतकर्‍यांच्या उपस्थितीत मुख्य कालव्याचे गेट उघडून तळणी शाखा कालव्याला पाणी सोडले. तर दुपारी दाती शिवारातून सुरू होणार्‍या कयाधू शाखा कालव्यात पाणी सोडले. यावेळी जमलेल्या हजारो शेतकर्‍यांनी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनेचा जयघोष केला.

या पाणी सोडो आंदोलनात आ. आष्टीकरासोबतच तालुका प्रमुख शामराव चव्हाण, जि.प. सदस्य गजानन गंगासागर, कळमनुरी पं.स.चे उपसभापती व यांच्याससह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.