
मनी लॉंडरिंगप्रकरणी ईडीने सूडबुद्धीने कारवाई करू नये यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करणाऱया आमदार प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या चौकशीला आज आक्षेप घेतला. ईडी एका प्रकरणाच्या चौकशीला बोलावते, पण इतर प्रकरणाचीही चौकशी करते असा दावा आमदार सरनाईक यांच्या वकिलांनी हायकोर्टात केला. दरम्यान, याचिकेत दुरुस्ती करण्यासाठी वेळ देत हायकोर्टाने या प्रकरणावरील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.
नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक करू नये यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा पूर्वेश, विहंग तसेच मेहुणा योगेश चांदेगला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी आमदार सरनाईक यांची बाजू मांडणाऱया ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी ईडीच्या कारभाराचा पाढा वाचला. ईडी चौकशीवेळी इतर प्रकरणांची चौकशी करत असल्याचे त्यांनी खंडपीठासमोर सांगितले. त्याला ईडीच्या वतीने बाजू मांडणाऱया सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी आक्षेप घेतला. याप्रकरणी सरनाईक यांना अद्याप समन्स बजावले नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, याचिकेत दुरुस्ती करण्यासाठी अॅड. देसाई यांनी खंडपीठाकडे वेळ मागितला. खंडपीठाने त्यास मुभा देत सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.





























































