मतदार याद्यांमध्ये घोळ कुणामुळे झाला, हे आयोगाने जाहीर करावे; आमदार सतेज पाटील यांचे आव्हान

ज्या लोकशाहीचा आदर आम्ही जगात सांगतो, त्या ठिकाणी आम्ही मतदार यादी नीट करू शकत नाही.मतदार याद्या बनविण्याचे काम दिलेल्या ‘त्या’ कंपनीचे नाव निवडणूक आयोगाने जाहीर करावे, असे आवाहन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड घोळ झाल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आहे.या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी निवडणूक आयोगानेच याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. ते म्हणाले, राजकीय पक्षांनी मतदार यादीचे काम करायचे म्हटले, तर निवडणूक आयोग कशाचे पैसे घेते, थोडा वेळ लागला, निवडणुका पुढे गेल्या तरी चालेल; पण हे दुरुस्त करून घ्यावे, असे सतेज पाटील यांनी सांगितले.

हेलिकॉप्टरमधून सातबारे उतारे फेकायचे बाकी

– सत्ताधाऱयांकडून जनतेवर आश्वासनांची खैरात केली जात आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून तर हेलिकॉप्टरमधून सातबारा उतारे फेकायचे बाकी राहिले आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे चिन्ह नाही, असे म्हणणे म्हणजे विरोधकांचा अभ्यास कमी असल्याचा टोला लगावत जिह्यात जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही चिन्हावर उभे असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

अधिवेशन घेण्याची ताकद यांच्यात नाही

– महायुती सरकारची आर्थिक परिस्थिती बघता अधिवेशन घेण्याची आर्थिक ताकददेखील या सरकारकडे नाही, असे सांगत आधी रस्त्यावरचे खड्डे भरा, मग प्रॉपर्टी कार्ड आणि दुबईसारखे स्वप्न दाखवा, असा टोलाही सतेज पाटील यांनी सत्ताधाऱयांना लगावला. ‘तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत, मालक आम्ही आहे’, म्हणणारे हे सरकार तिजोरीचे मालक महाराष्ट्राची जनता आहे हेच विसरले असल्याची टीकाही पाटील यांनी केली. एखादा मंत्री लक्ष्मी येणार आहे, असे म्हणत असेल तर निवडणूक आयोगाने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का, असा सवाल त्यांनी केला. कागलमध्ये कार्यकर्त्यांना वाऱयावर सोडून नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे कागलची जनता याबाबत निर्णय घेईल, असे सांगत आम्हीही कागलमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिल्याचे पाटील यांनी सांगितले.