
अदानी उद्योग समूहासाठी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्यावर दबाव टाकला, असा खळबळजनक आरोप करणाऱया श्रीलंकेतील अधिकाऱयाने अखेर हा आरोप मागे घेतला.
त्याने वादग्रस्त विधानाबद्दल मोदींची माफी मागितली असून सीलोन इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या (सीईबी) अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला आहे. श्रीलंकेतील मोठा ऊर्जा प्रकल्प गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाला देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्यावर दबाव टाकल्याचा दावा सीईबीचे अध्यक्ष एमएमसी फर्डिनेंडो यांनी शुक्रवारी संसदीय पॅनेलपुढे केला होता.
त्यांच्या आरोपानंतर मोठा वाद निर्माण झाला. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवन ऊर्जा प्रकल्प थेट अदानी समूहाला देण्यासाठी दबाव टाकला होता, असे फर्डिनेंडो म्हणाले होते. सोमवारी त्यांनी आपले वादग्रस्त विधान मागे घेत सीईबीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती राजपक्षे यांनीही त्यांच्या विधानाचे खंडन केले होते.























































