
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईची झपाट्याने वाढती लोकसंख्या व पायाभूत सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेशाची (एमएमआर) हद्द वाढवण्याचा ठराव आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे वसई, पेण, खालापूर, पनवेल, पालघर आणि अलिबागपर्यंत मुंबई महागर प्रदेशाची हद्द विस्तारली आहे. सध्याचा एमएमआरच्या चार हजार चौरस किमीच्या परिसराचा विस्तार तब्बल सहा हजार चौरस किमीपर्यंत झाला आहे. एमएमआरचा विस्तार झाल्यामुळे नवीन खाडी पूल, विकास केंद्रे, भाईदर, वसई-विरारचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटण्यास मदत होईल आणि लोकल ट्रेन थेट अलिबागपर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा होईल.
मुंबई महानगर प्रदेशातील परिसराचा जलदगतीने विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार करण्याची मागणी सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी केली होती. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा पैसा केवळ मुंबई व ठाण्यात न वापरता आसपासच्या परिसरात वापरला गेला पाहिजे. पायाभूत सुविधा वाढल्या पाहिजेत अशी लोकप्रतिनिधींची मागणी होती. त्यामुळे महानगर प्रदेशाचा विस्तार करण्याची मागणी होती. त्यादृष्टीने मांडण्यात आलेला ठराव दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आला. त्यामुळे पालघर, वसई, खालापूर, पेण, पनवेल, अलिबाग आदी तालुक्यांचे सर्व भाग मुंबई महानगर प्रदेशात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक नगरपालिका, ग्रामपंचायती, नगरपंयातींना पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध होत नव्हता; पण एमएमआर विभागाची हद्द वाढवल्यामुळे या भागांना एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
समतोल विस्तारासाठी
देशाच्या आर्थिक राजधानीचा समतोल विकास करण्यासाठी हा प्रस्ताव आणला होता. एमएमआरडीएच्या माध्यमातून जे पायाभूत प्रकल्प सुरू आहेत त्याला चालना मिळेल. एमएमआरडीएच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाला चालना मिळेल, असे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर या ठरावावर विधानसभेत बोलताना सांगितले.
नवीन खाडी पुलाची उभारणी
मीरा, भाईंदरपासून वसईला जोडणाऱया खाडीच्या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी करून थेट वसईपर्यंत जाण्याचा मार्ग एमएमआरडीएच्या माध्यमातून काम केल्यावर पूर्ण होईल.
सूर्या प्रकल्प मार्गी
वसई, विरार, मीरा-भाईंदरचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी सूर्या प्रकल्प तयार होत आहे. हे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण होईल.
मुंबई महानगर प्रदेशाची हद्द
कल्याण , भिवंडी व अंबरनाथ या तालुक्यांच्या पूर्व सीमा आणि कर्जत तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली शेलू ते कळंबोली, वरडी आणि ताकवे, भालीवडी, सावेळे, हेदवली, मांडवणे, भिवपुरी, हुमगाव, साईडोंबर, ढाक, साल्पे, खरवंडी ते चोची गावापर्यंत आणि खालापूर तालुक्याची पूर्व सीमा बृहन्मुंबईचे संपूर्ण क्षेत्र आणि पालघर, ठाणे व रायगड जिह्यांचा भाग, खालापूर, पेण, पनवेल तालुक्याची दक्षिण सीमा, पालघर तालुक्याची उत्तर व पूर्व सीमा आणि वसई तालुक्याची तानसा नदीपर्यंत पूर्व सीमा आणि तानसा नदी.
विस्ताराचे फायदे
- एमएमआरडीएच्या माध्यमातून वसई-मीरा भाईंदरदरम्यान नवीन खाडी पूल
- डहाणूपर्यंतच्या लोकल मार्गातील उर्वरित अडथळे दूर होतील
- वसई-विरार व बोईसर येथे नवीन विकास केंद्रे (ग्रोथ सेंटर)
- पेण- अलिबागमध्ये ट्रान्स हार्बर प्रकल्प
- भाईंदर व वसई विरार क्षेत्रासाठी सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प
- विरार ते अलिबागदरम्यान बहुउद्देशीय मार्गिका (मल्टी मोडल कॉरीडॉर)
- खालापूरमध्ये नवीन एमआयडीसी
- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूंचा भाग एमएमआरडीएमध्ये समाविष्ट होईल.
- ट्रान्स हार्बर लिंक अलिबागपर्यंत नेण्यासाठी एमएमआरडीएचा हातभार लागेल.
- नैना प्रकल्पाला चालना.




























































