
विविध गुन्ह्यांखाली कारागृहात असलेल्या कैद्यांना कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी जेल प्रशासनाने कॉईन बॉक्स फोनची सुविधा दिलेली आहे. पण सध्या बाजारात कॉईन बॉक्स उपलब्ध होत नसल्याने कैद्यांना आता मोबाईल फोनची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.
राज्यातल्या जेलमध्ये कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी एमटीएनएल आणि बीएसएनएल कंपनीच्या कॉईन बॉक्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पण सध्याच्या स्मार्ट फोन जगात कॉईन बॉक्स सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. त्याशिवाय हे कॉईन बॉक्स नादुरुस्त झाल्यास दुरुस्तही करून मिळत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे अतिसुरक्षित विभागात, सुरक्षा यार्डात व स्वतंत्र सेलमध्ये ठेवलेल्या कैद्यांना कॉईन बॉक्स ज्या ठिकाणी लावला आहे अशा ठिकाणी नेणे धोकादायक ठरते. त्यामुळे कैद्याच्या व पर्यायाने कारागृहाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कैद्यांना साधे मोबाईल वापरण्यास देण्याची सूचना राज्यातील कारागृह प्रशासनाने गृह विभागाला केली होती. गृह विभागाने ही विनंती मान्य केली असून पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांना साध्या मोबाईल फोनवरून कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची मुभा दिली आहे. सध्या येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यास राज्यातल्या इतर कारागृहांतील कैद्यांनाही साध्या मोबाईल फोनवरून संपर्क साधण्याची सुविधा देण्यात येईल.


























































