मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी पकडले, तिघे चोरटे गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बसची वाट पाहत थांबलेल्या तरूणाच्या हातातील मोबाइल हिसकावून पळून जाण्याच्या प्रयत्नातील चोरट्यांना नागरिकांनी पाठलाग करून पकडले. ही घटना 4 जुलैला संध्याकाळी सहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयानजीक बसस्थानकावर घडली.

मधु व्यंकय्या (वय 55), पी. प्रेमकुमार ब्रम्हेय्या (वय 23), पी धनराज कन्हैया (वय 29, तिघे मूळ रा. ग्रीन पार्क, हैद्राबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रतीक खेडकर (वय 19, रा. वडगाव बुद्रुक) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास प्रतीक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पीएमपी थांब्यावर उभे होते. त्यावेळी तिघाजणांनी त्यांच्या हातातील 15 हजारांचा मोबाइल हिसकावून मध्यवर्ती शासकीय कार्यालयाच्या दिशेने पळ काढला.

त्यामुळे प्रतीकने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे तपास करत आहेत.