‘मोक्का’ कारवाईनंतर फरार झालेल्याला शिरवळमध्ये पकडले; गुन्हे शाखेच्या युनीट एकची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यापारी पेठेत दहशत असलेल्या आंदेकर टोळीतील सराईतावर खुनी हल्ला करून पसार झालेल्या गुंडाला गुन्हे शाखेने शिरवळमध्ये पकडले आहे. सोमनाथ सयाजी गायकवाड (वय 36, रा. अशोक चौक, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात खुनाचे दोन गुन्हे, गोळीबार, मारामारी, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे 12 गुन्हे दाखल आहेत.

आंदेकर टोळीतील काहीजणांबरोबर वाद झाल्याने सूरज ठोंबरे, सोमनाथ गायकवाड यांनी स्वत:ची टोळी सुरू केली. त्यांनी व्यापारी पेठेत दहशत निर्माण करून आंदेकर टोळीतील गुंडांवर हल्ले सुरू केले होते. ठोंबरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदयान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आल्यानंतर गायकवाड पसार झाला. तो शिरवळ एसटी स्थानक परिसरात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस नाईक अजय थोरात इम्रान शेख यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार हवालदार योगेश जगताप यांनी तांत्रिक विश्लेषण करीत गायकवाडला शिरवळ भागात पकडले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अजय थोरात, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, योगेश जगताप, महेश बामगुडे, शशिकांत दरेकर, मीना पिंजण, रूक्साना सय्यद यांच्या पथकाने केली.