मोडक सागर तुडुंब, तलावांत एप्रिलपर्यंतचा पाणीसाठा जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमधील महत्त्वाचा तलाव असणारा मोडक सागर आज सायंकाळी 5.30 वाजता तुडुंब भरून वाहू लागला. त्यामुळे मुंबईकरांना सलग दुसर्‍या दिवशी तिसरा तलाव भरून वाहू लागल्याची खूशखबर मिळाली आहे. याआधी तुलसी आणि गुरुवारीच तानसा तलाव भरून वाहू लागला असून तलावांत एप्रिल 2020 पर्यंतचा पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणार्‍या सातही तलावांत सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे पाणीसाठा वाढू लागला आहे. 26 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांत एकूण 9,31,200 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला असून हा पाणीसाठा दैनंदिन पाणीपुरवठा 3,650 दशलक्ष लिटर पाहता पुढील 254 दिकस पुरेल इतका म्हणजे 5 एप्रिल 2020 पर्यंत पुरेल इतका आहे. पावसाळ्याचे आणखीन दोन महिने बाकी आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास मध्य वैतरणा तलावही लवकरच भरून काहू लागेल.

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा 36,490

मोडक सागर 1,28,925

तानसा       1,44,475

मध्य वैतरणा 1,59,914

भातसा       4,33,386

विहार           19,964

तुळसी              8046

एकूण : 9 लाख 31 हजार 200 दशलक्ष लिटर