
सामना प्रतिनिधी, मुंबई
एका मॉडेलने चार वाहनांना धडक दिल्याची घटना रविवारी रात्री सांताक्रूझ परिसरात घडली. धडकेमुळे 4-5 वाहनांचे नुकसान झाले आहे. सांताक्रूझ पोलिसांनी त्या मॉडेलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.बॉलीवूडशी संबंधित असलेली मॉडेल रविवारी रात्री खार परिसरात मित्रांसोबत गेली होती. खार येथे एका दुकानात त्या मॉडेल आणि तिच्या काही सहकाऱ्यांनी तेथे वाद घातला. या घटनेची माहिती समजताच खार पोलीस तेथे गेले.
वाद सोडवत असताना एकाने पोलिसाला धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खार पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. त्या दोघांना पुढील कारवाईकरता पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर मॉडेलने सांताक्रूझ परिसरात चार-पाच वाहनांना धडक दिली. धडकेची माहिती समजताच सांताक्रूझ पोलीस घटनास्थळी गेले. सांताक्रूझ पोलिसांनी त्या मॉडेलविरोधात गुन्हा दाखल केला. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर तिने मद्य प्राशन केले होते का हे स्पष्ट होणार आहे.
























































