
प्रत्येकजण नव्या वर्षात काही संकल्प करतो. यावेळी नव्या वर्षात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ म्हणजेच स्वदेशी वस्तूच खरेदी करण्याचा संकल्प करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या वर्षातील अखेरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या आकाशवाणीवरील भाषणात नव्या वर्षाचे स्वागत, आत्मनिर्भर भारत, स्वदेशीचे उत्पादन, वन्यजीवांची काळजी आणि कश्मीरचे लोकप्रिय केसर या मुद्दय़ांनाही स्पर्श केला.
मावळत्या वर्षाने आपल्यापुढे संकटांचा पर्वत उभा केला आहे तो पार करून आपल्याला नव्या वर्षाचे स्वागत आणि पुढील वाटचाल करायची आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
नकळतपणे विदेशात तयार होणाऱया वस्तू तर आपण घेत नाही ना? यासाठी त्या वस्तूंना पर्याय म्हणून हिंदुस्थानात तयार झालेल्या पर्यायी वस्तूची माहिती घ्या. त्या वस्तू देशातच तयार होतील आणि त्या जागतिक दर्जाच्या असतील यासाठी प्रयत्न करा, असे कळकळीचे आवाहन मोदी यांनी केले.
कोरोना संकटात देशवासीयांनी दाखवलेली एकजूट प्रेरक
जगासह देशावर कोरोना महामारीचे संकट असताना आपला ‘जनता कर्फ्यू’सारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरक ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशाने कोरोना योद्धय़ांचा सन्मान केला, एकजूट दाखवली हेसुद्धा अनेकांनी लक्षात ठेवले असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, कश्मीरच्या केसराला मिळालेला जागतिक टॅग, कर्नाटकातील युवा ब्रिगेडने श्रीरंगपट्टणमच्या वीरभद्र स्वामी मंदिराचा केलेला कायाकल्प आणि देशात वाढलेली बिबटय़ांची संख्या या गोष्टी नक्कीच मनाला सुखावणाऱया आहेत. चला नव्या वर्षात एकजुटीने देशाला समृद्ध बनवूया, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी शेवटी केले.



























































