मोहम्मद सिराज बनला नंबर 1 वनडे गोलंदाज; श्रीलंका-न्यूझीलंड विरुद्ध केली चमकदार कामगिरी

नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत (वनडे) श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या शानदार कामगिरीनंतर मोहम्मद सिराज हा जागतिक क्रमवारीत नंबर 1 गोलंदाज बनला.

सिराज गेल्या काही वर्षांपासून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हिंदुस्थानचा उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह संघात अनुपस्थित होता त्या काळात त्यानं जबरदस्त कामगिरी केली होती. 28 वर्षीय खेळाडूने श्रीलंकेविरुद्ध आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात लागोपाठ चार विकेट्स घेत संघात त्याचे महत्त्व अधोरेखित केले होते.

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत वेगवान गोलंदाजाने 10.22 च्या सरासरीने नऊ विकेट्स घेतल्या.

अंतिम सामन्यासाठी विश्रांती दिल्यानंतर सिराजने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पाच विकेट्स पूर्ण केल्या, ज्यामध्ये हिंदुस्थानने 3-0 असा व्हाईटवॉश दिला होता. 2022 च्या ICC च्या ODI संघात श्रेयस अय्यर सोबत त्याचे नाव देण्यात आले होते.

आता, या क्रिकेटपटूने त्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला आहे. कारण तो ICC क्रमवारीत ताज्या अपडेटनंतर एकदिवसीय सामन्यांच्या फॉरमॅटमध्ये क्रमांक 1 चा गोलंदाज बनला आहे. त्याच्या नावावर 729 गुण आहेत.

ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड दुसऱ्या स्थानावर असून न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट तिसऱ्या स्थानावर आहे.

हिंदुस्थानचा कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी खेळानंतर सांगितले की, सिराजला या क्षणी संघाला त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत हे समजते.

‘मी त्याच्याबद्दल बरेच काही बोललो आहे. तो जितके जास्त क्रिकेट खेळला आहे तितकी त्याची गोलंदाजी समजून घेण्याच्या बाबतीत तो अधिक चांगला झाला आहे. मला वाटते की या खेळात, तुम्ही काय करू शकता हे समजून घेणे आवश्यक आहे. तुमची क्षमता काय आहे, हे ज्या क्षणी तुम्ही समजून घ्या की तुम्ही संघासाठी अधिक प्रभावी ठरू शकता आणि सिराजने गेल्या काही वर्षांत तेच केले आहे. तो कोणताही फॉरमॅट असो. त्याने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. संघाला त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत हे त्याला समजले आहे. या आणि नवीन चेंडू घ्या. चेंडू स्विंग करण्यासाठी, लवकर विकेट मिळवा. मधल्या षटकांमध्ये, पुन्हा त्याच्याकडे खूप कौशल्य आहे’, असे शर्मा म्हणाले.