परिक्षेत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याची शाळेतच गळफास घेत आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील नवोदय विद्यालयात बारावीत शिकणाऱया विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून या आत्महत्येला जबाबदार असणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली. देवानंद ज्ञानेश्वर भोसले असे मृताचे नाव आहे.

देवानंद हा नवोदय विद्यालयात बारावीमध्ये शिकत होता. घटनेच्या दोन दिवस आधी त्याने आईला फोन करून माझ्या डोळ्याला कमी दिसत आहे, दवाखान्यात जावे लागेल, असे सांगितले होते. सोमवारी (दि. 29) सायंकाळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते. मात्र, देवानंद दिसला नाही. त्यामुळे शिक्षकांनी त्याचा शोध घेतला असता, तो बाथरूममध्ये गेल्याचे समजले. शिक्षकांनी त्याला आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडला असता, त्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर शिक्षकांनी मोहोळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी मोहोळ पोलीस ठाण्यासमोर आमच्या मुलाला न्याय द्या म्हणत त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. शेवटी पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेले.

पारधी समाजातून महाराष्ट्रात पहिला

– देवानंद हा मोहोळ येथील दत्तनगरमध्ये चालणाऱया भारतमाता आदिवासी पारधी समाज व भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या वसतिगृहात 2010 सालात शिकण्यासाठी राहात होता. तिथल्या चांगल्या संस्कारामुळे त्याला शिक्षणाची गोडी लागली होती. त्याने यंदाच्या वर्षी 95 टक्के गुण मिळवत थेट बारावीत प्रवेश मिळविला होता. तो पारधी समाजातून महाराष्ट्रात प्रथम आला होता. त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात होती.