
चंद्रपूरच्या राजुरा शहरातील सोमनाथपुर वार्ड भागात विचित्र संकटात अडकलेल्या एका माकडाच्या पिलाच्या सुटकेसाठी वनविभागाच्या 3 विशेष पथकांनी प्रयत्नांची शर्थ केली. सोमेश्वर मंदिराजवळ एका माकडाच्या पिलाचे तोंड लोट्यात (गडव्यात) अडकले.
या पिलाच्या सुटकेसाठी माकडाचा टोळीने जिवाचा आकांत चालविला होता. वानरसेनेने या भागात या घटनेनंतर धुमाकूळ घातला होता. वनविभागाला याची माहिती मिळताच वनपथक घटनास्थळी पोचले. माकडाच्या पिलाला ताब्यात घेण्याकरीता पिंजरा, जाळी, तसेच खाद्य वापरुन प्रयत्न करण्यात आले परंतु माकडाची टोळी दाद देईनाशी झाली.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बचाव पथक तसेच कोठारी येथील बचाव पथकाला पाचारण करून योजना आखण्यात आली. तब्बल साडेसहा तासाच्या अथक परिश्रमा नंतर पिलाला ताब्यात घेतले गेले. पिलाच्या चेहऱ्यावर अडकलेला लोटा कापून काढण्यात आला. माकडाच्या पिल्ल्याची प्राथमिक आरोग्य तपासणी व उपचार करून सुदृढ असल्याची खात्री केली व त्याच्या आईसोबत निसर्गमुक्त करण्यात आले. वन विभागाच्या या कामगिरीचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.
व्हिडीओ-






























































