मुंबईकरांनो सावधान! मोनो रेलच्या बीम्समधून वाहतोय हाय व्होल्टेज वीजप्रवाह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

चेंबूर ते सातरस्त्यापर्यंतचा टप्पा गाठणारी मोनो रेल ही प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत असली तरी ती ज्या खांबांवरून धावतेय त्यांच्याजवळ जाणेही जीवघेणे ठरू शकते. मोनो रेलचे ट्रक्स असलेल्या बीम्सला दोन्ही बाजूंनी लावलेल्या पॉवर ट्रक्शन्समधून 750 व्होल्टेजचा वीजप्रवाह सोडण्यात आला आहे. बीम्सपासून दोन मीटरपर्यंत धातूच्या वस्तू किंवा माणूस गेला तर त्याला जबरदस्त शॉक लागू शकतो. त्यामुळे मोनो रेलच्या बीम्सजवळ कुणीही जाऊ नये किंवा उंच क्रेन्सही तिथून नेऊ नयेत असा इशारा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिला आहे.

मोनो रेलचा वडाळा ते सातरस्ता हा दुसरा टप्पा गेल्या 4 मार्चपासून सुरू झाला. या टप्प्यामध्ये दाट लोकवस्तीचा भाग आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी एमएमआरडीएने जाहीर नोटिशीद्वारे याबाबत माहिती दिली आहे. मोनो रेलचा मार्ग असलेल्या रस्त्यांवरून साडेपाच मीटरपेक्षा जास्त उंचीची वाहने किंवा क्रेन्स नेल्यास शॉक लागू शकतो असा इशारा या नोटिशीत देण्यात आला आहे.

गणेशोत्सव, दहीहंडीवेळीही सावध राहा!
ना.म.जोशी मार्ग, लालबाग, परळ येथून उंच गणपतींच्या मिरवणुकांचा बराचसा मार्ग हा मोनो रेल असलेल्या रस्त्यांवरूनच आहे. त्याचप्रमाणे याच भागात दहीहंडीचा उत्सवही मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. दहीहंडय़ा उंचावर बांधल्या जातात. त्यामुळे गणपती मिरवणुका आणि दहीहंडी उत्सवाच्या वेळी सावधगिरी बाळगावी, असेही एमएमआरडीएने सांगितले आहे.

खांबांवर पोस्टर्स, बॅनर्स लावणे ठरू शकते जीवघेणे
मोनो रेलच्या खांबांवर पोस्टर्स चिटकवली जातात. बॅनर्स बांधले जातात. त्यासाठी शिडय़ा लावून वर चढले जाते. असे करणे जीवघेणे ठरू शकते असे सांगतानाच पोस्टर्स चिटकवताना कुणी आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एमएमआरडीएने सांगितले आहे.