मॉन्सूनने मुहुर्त चुकवला, हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मॉन्सूनने केरळमध्ये दाखल होण्याचे हवामान खात्याचे आणि खासगी हवामान संस्था स्कायमेट या दोघांचे अंदाज चुकवले आहेत. स्कायमेटने अंदाज वर्तवला होता की मॉन्सूनचं केरळमध्ये 26 मे रोजी आगमन होईल. हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता की मॉन्सूनचं केरळमध्ये 27 मे रोजी आगमन होईल. मात्र दोन्ही अंदाज मॉन्सूनने चुकवले आहेत. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना म्हटले की अंदाज वर्तवत असताना मॉन्सूनचे आगमन 4 दिवस पाठीपुढे होऊ शकतं असं सांगण्यात आलं होतं.

मॉन्सूनच्या आगमनाची तारीख चुकली असली तरी हवामान खात्याने दावा केला आहे की मॉन्सूनच्या आगमनाचा अचूक अंदाज आम्ही लवकरच जाहीर करू. गुरुवारी केरळमधील सगळ्या हवामान केंद्रांपैकी फक्त 33 टक्के केंद्रांवर लक्षणीय प्रमाणात पाऊस पडल्याचे नोंदवण्यात आले आहे. 10 मे नंतर सलग दोन दिवस केरळमधील सगळ्या हवामान केंद्रांपैकी 60 टक्के हवामान केंद्रांवर 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद केली जात नाही तोपर्यंत मॉन्सूनचे आगम झाले असे घोषित केले जात नाही. यामुळेच पावसाचे आगमन झाल्याचे हवामान खात्याने घोषित केले नाही. केरळमध्ये पाऊस दाखल झाल्याची घोषणा करण्यासाठी गरजेच्या असलेल्या सर्व बाबी दिसून आल्या असल्या तरी पावसाचं प्रमाण अद्याप असमाधानकारक असल्याने मॉन्सूनच्या आगमनाची घोषणा करण्यात आली नाही असं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.