
जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून भाग बदलून परिसरात पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे हवेतील उकाडा कमी झाल्याने गारवा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी वाफसा आल्याने सोयाबीन पेरणीला जोर आला आहे. मात्र, आगस पेरणी केलेल्या सोयाबीनमध्ये उतार कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे.
यंदा भरपूर पाऊस पडणार असल्याचे भाकीत अनेकांनी वर्तविले. तसेच, हवामान विभाग व हवामान तज्ञांनीदेखील चांगल्याप्रकारे पाऊस होणार असल्याचा व मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला. या अंदाजावरून शेतकरी एप्रिल, मेपासूनच खरिपाच्या मशागतीला लागला. मे अखेरपर्यंत सर्व मेहनत करून शेत तयार करून ठेवले. ज्या शेतकऱ्यांना पाण्याचे साधन उपलब्ध होते, अशा शेतकरी बांधवांनी मे महिन्यातच कपाशीची लागवड केली; परंतु काही शेतकऱ्यांनी 10 जूनपासून कपाशी लागवड सुरू केली. त्याचदरम्यान परिसरात 8 जून ते 11 जूनपर्यंत तीन दमदार पाऊस झाल्याने व जमिनीची ओल खोलवर गेल्याने 13 ते 14 जूनपासून सोयाबीन पेरणीला सुरुवात झाली.
15 ते 16 जूननंतर पावसाने सात-आठ दिवस दडी मारली आणि त्यानंतर 25, 26 जूनपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने कपाशीची पिके तरारून आली; परंतु सोयाबीनला फटका बसला व उगवण पातळ झाली. अत्यंत कमी उगवण झाल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे खत बियाणे वाया गेल्याने यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नगदी पीक म्हणून कापूस व सोयाबीन पिकाकडे बघितले जाते; परंतु निसर्गदेखील लहरी झाल्याने त्याचा फटका कायमच शेतकऱ्यांना बसत आहे.
बळीराजाला मोठय़ा पावसाची आस
खरिपाची पिके उतरती झाल्याने आता शेतकऱ्यांना मोठय़ा व दमदार पावसाची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडतो आहे. मात्र, 10 ते 15 मिनिटांपेक्षा जादा वेळ बरसत नसल्याने मोठा पाऊस झाल्याशिवाय शेतातून पाणी बाहेर निघणार नाही. त्याशिवाय उन्हाळा हटणार नाही. म्हणूनच आता मोठय़ा पावसाची बळीराजाला आस लागली आहे.
नवीन तणनाशकांमुळे तणांचा प्रादुर्भाव कमी
यंदा कपाशी व सोयाबीन बियाणाचे अनेक वाण बाजारात आल्याने पाहिजे त्या जातीचे बियाणे मिळाले. बदलत्या काळाबरोबरच शेतकरीही आधुनिक झाल्याने अनेकांनी ठिबकवर कपाशीची लागवड केली आहे. तर जादा पाऊस झाल्यानंतर सोयाबीनला फटका बसू नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी सऱ्या पाडून टोकण यंत्राच्या साहाय्याने व मजुरांच्या साहाय्याने सरी वरंब्यावर सोयाबीनची लागवड केली आहे. सोयाबीन व कपाशीसाठी नवीन तणनाशक बाजारात आल्याने याचा उपयोग शेतकऱ्यांनी केल्याने तणाचा प्रादुर्भाव कमी दिसत आहे.
































































