
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू असताना सकाळपासून दिवसभरात संततधार पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. तर, जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सायंकाळी सिंधुदुर्ग जिह्यातून खारेपाटण-गगनबावडा रस्ता, भुईबावडा घाटात गगनबावडय़ाच्या अलीकडे 5 किलोमीटर अंतरावर दरड कोसळली.
कोल्हापूर जिल्ह्याला सलग तीन वर्षे अतिवृष्टीमुळे महापुराचा फटका बसला आहे. यंदाही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने महापुराची धाकधूक वाढली होती. पूरग्रस्त भागातील नागरिकांनी अन्यत्र स्थलांतराची तयारी करून ठेवली आहे. गेल्या वर्षी जूनच्या मध्यात दमदार पावसाने नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. मात्र, यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणांमधील कमी झालेला पाणीसाठा, नद्यांची खालावलेली पाणीपातळी तसेच दुबार पेरणीसह कोरडय़ा दुष्काळाचे संकट निर्माण झाले होते. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांत जिह्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपासून तर जोर वाढत होता. आज सकाळपासून दिवसभरात संततधार पावसामुळे मान्सून सक्रिय झाल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.
गेल्यावर्षी आजच्या दिवसापर्यंत जिह्यात 1 हजार 198 मिमी पाऊस झाला होता. यावेळी मात्र 974 मिमी पाऊस झाला. जिह्यात कालपासून आज सकाळी दहापर्यंत भुदरगड तालुक्यात सर्वाधिक 15.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिह्यात पावसाचा जोर वाढत आहे.धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पात्रात वाढ होत आहे. आठवडय़ापूर्वी जिह्यात नद्यांनी तळ गाठल्याचे चित्र होते. पंचगंगा नदीची पाणीपातळी केवळ 8.2 फुटांवर आल्याने पात्रातील मंदिरे उघडी पडली होती. मात्र, चार-पाच दिवसांत धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे नद्यांची पातळी वाढली आहे. पंचगंगेची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी 15.4 फूट झाली होती, तर काल इचलकरंजी आणि रुई हे दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर पाहाता, रात्री उशिरापर्यंत आणखी बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
राधानगरी धरणातून एक हजार क्युसेकने विसर्ग
राधानगरी धरणात सध्या 67.18 दलघमी पाणीसाठा असून, सकाळी 7च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून एक हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू होता, तर कोयना धरणातून 1 हजार 50 आणि अल्लमट्टी धरणातून 451 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.
खरिपाची 52 टक्के पेरणी
जिल्ह्यात पावसाने अपेक्षित जोर धरला नसला, तरी पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून, पेरण्यांनाही वेग आला आहे. जिह्यात 2 लाख 4 हजार 225 हेक्टरवर खरिपाची पेरणी केली जाते. सध्या यापैकी 1 लाख 6 हजार 377 हेक्टरवर पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी 52 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात जमिनीला ओलही येईना
सोलापूर जिल्ह्यात तब्बत महिना उलटला तरी पेरणीयोग्य पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. आतापर्यंत सरासरी 87 मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, हा पाऊस जमिनीच्या ओलाव्यासाठी अपुरा असल्याचे दिसून येत आहे. ऐन सुरुवातीलाच पावसाने ओढ दिल्याने पेरण्याही खोळंबल्याचे चित्र आहे. सोलापूर जिह्यात खरिपाचे दोन लाख 34 हजार हेक्टर क्षेत्र असून, पावसाने ओढ दिल्याने अद्यापि या क्षेत्रात पेरण्या झाल्या नाहीत.
गतवर्षी याच महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जवळपास 1.67 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. काही तालुक्यात थोडाफार पाऊस झाला आहे; परंतु वातावरणातील बदलाने पाऊस हुलकावणी देत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी जून महिन्यामध्ये 168 मिलिमीटर पावसाची नोंद होती. यंदाच्या वर्षी मात्र आतापर्यंत सरासरी 80 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. पेरणीसाठी सोयाबीन, उडीद, तूर, सूर्यफूल या पिकांची तयारी शेतकऱयाने केली आहे; परंतु पावसाचा भरवसा नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. एकीकडे पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकांची पेरणी लांबली असताना उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र आहे.
उजनी मायनस 11 टक्क्यांवर
उजनीच्या पाणलोटात अद्यापि जोरदार पाऊस न झाल्याने उजनीतील पाण्याची पातळी खालावत आहे. आज उजनीत वजा 11 टक्के पाणीसाठा असून, 54 टीएमसी पाणी शिल्लक आहे. जूनच्या अखेरीस उजनी पाणलोट क्षेत्रात 50 टक्केही पाऊस झालेला नाही. मागच्या वर्षी 112 टक्के भरलेले उजनी धरण आता झपाटय़ाने तळ गाठत आहे. आपत्कालीन परिस्थितीत वजा 50 टक्क्यांपर्यंत पाणी वापरले जाऊ शकते. पावसाची अशी स्थिती राहिली, तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. उजनीसह एकरुख, हिंगणी, आष्टी, बोरी, पिंपळगाव आदी लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठाही संपला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो.
पावसाअभावी सांगली जिल्ह्यातील पेरण्या ठप्प
हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज सलग चौथ्यांदा खोटा ठरवत सांगली जिह्यात पावसाने दडी मारली आहे. जिह्यात काही भागात तुरळक स्वरूपाचा, तर सांगली शहरात केवळ पावसाचा शिडकावा सुरू आहे. पावसाअभावी जिह्यातील पेरण्या पूर्णपणे ठप्प असून, शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने सर्वच यंत्रणा चिंतेत पडल्या आहेत.
संपूर्ण जून महिन्यात पावसाने एक-दोन सरी वगळता पूर्णपणे उघडीप दिली. मान्सूनपूर्व झालेल्या पावसाच्या भरवशावर जिह्यात अनेक शेतकऱयांनी पेरण्या करण्याची घाई केली. मात्र, त्यानंतर सलग महिन्यावर पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने पिके वाळू लागली आहेत. हवामान खात्याने गेल्या चार दिवसांपूर्वी जिह्यात सलग चार दिवस जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, चौथ्या दिवशीही पावसाने जिह्यात कुठेही हजेरी लावल्याचे दिसून येत नाही. संपूर्ण जून महिना आणि त्यानंतर जुलैचा पहिला आठवडाही कोरडा ठणठणीत जात असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. कोयना धरणासह जिह्यातील वारणा व इतर धरणातील पाणीसाठय़ात कोणतीही वाढ झाली नसल्याने भविष्यात नागरिकांना प्यायलाही पाणी उपलब्ध होईल का नाही? या चिंतेने प्रशासकीय यंत्रणा धास्तावली आहे. जिह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 10.88 टीएमसी पाणीसाठा असून, या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी आहे.
साताऱ्याच्या पश्चिम भागात 50 टक्केही पाऊस नाही
‘महाराष्ट्राची चेरापुंजी’ मानल्या जाणाऱया महाबळेश्वरसह पावसाचे आगार असलेल्या सातारा जिह्याच्या पश्चिम भागातच जुलै उजाडला तरी पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला 50 टक्केही पाऊस झालेला नसल्याने जिह्यातील धरणांनी तळ गाठला असून, खरिपाच्या पेरण्याही रखडल्या आहेत.
यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱयांसह सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या होत्या. शेतकऱयांनी शेतीच्या मशागती करून खरिपाच्या पेरणीची उत्साहाने तयारी केली आहे. बी-बियाणे आणि खते घेऊन ठेवली आहेत. पाऊस झाला की पेरण्या उरकून घेण्याचा विचार केला होता; पण जुलै उजाडला तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही.
सातारा जिह्याच्या पश्चिम भागात म्हणजेच सह्याद्रीच्या पर्वतरांगेत तुफान पर्जन्यवृष्टी होत असते. जिह्याचा पूर्व भाग अत्यल्प पावसामुळे नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसत असतो. या पूर्व भागात पावसाने दडी मारली आहे आणि पावसाचे आगार मानल्या जाणाऱया पश्चिम भागातही पाऊस नसल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात आजअखेर कोयनानगरला 507, नवजाला 610, तर महाबळेश्वरला 566 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला कोयनानगरला 925, नवजाला 1092, तर महाबळेश्वरला 1287 मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा जिह्यात सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पश्चिम भागात जेमतेम 30 ते 40 टक्के पेरण्या झाल्या असून, पूर्व भागात अद्याप पाच टक्केही पेरण्या झाल्या नाहीत.
कोयना धरणाने गाठला तळ
जुलै महिना सुरू होऊनही कोयना धरणातील पाणीसाठय़ाने तळ गाठला आहे. धरणात केवळ 14.08 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणातील हा पाणीसाठा चिंताजनक आहे. उपलब्ध पाणीसाठय़ावर पूर्वेकडील सिंचन व पश्चिमेकडील वीज प्रकल्प कार्यान्वित आहे. धरणात अत्यल्प पाणीसाठा असून, पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू न झाल्यास 10 जुलैपासून पश्चिमेकडील वीज प्रकल्प बंद होणार असल्याची माहिती कोयना जलविद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी दिली. दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दबक्या स्वरूपात आगमन केले आहे. हवामान खात्याने पाच दिवस अतिवृष्टीचे जाहीर केल्यामुळे प्रशासन अलर्ट आहे. धरणाची पाणीपातळी सध्या 2039.09 फूट असून, धरणात 14.08 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातील 13.71 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे.
























































