
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर पत्नी हसीनने केलेल्या गंभीर आरोपाचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. बांगलादेशचा मधल्या फळीतील फलंदाज मोसादेक हुसैन यांच्यावर पत्नीने हुंड्यासाठी त्रास दिल्याचा आरोप केला आहे.
मोसादेक हुसैनची पत्नी शरमीन समीरा ऊषा हिने हुंड्यावरून पतीने त्रास दिल्यााचा खटला न्यायालयात दाखल केला आहे. बांगलादेशमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शरमीन हिने पतीने मला हुंड्यासाठी टॉर्चर केल्याचा आरोप केला आहे. शरमीनच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 15 ऑगस्टला मोसादेकने 10 लाख टका (बांगलादेशी चलन) देण्यासाठी पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढले होते. या प्रकरणी प्रशासनाने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मोसादेकचा भाऊ मोसाब्बेर हुसैन याने सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. पैसे उकळण्यासाठी शरमीन खोटे आरोप करत असल्याचे मोसाब्बेरने म्हटले आहे. लग्न झाल्यापासून दोघांमधील संबंध चांगले नसल्याचेही त्याने म्हटले आहे.
मोसादेकला बसू शकतो फटका
मोसादेक बांगलादेशच्या संघातील नियमीत सदस्य असून या प्रकरणामुळे त्याच्या कारकीर्दीवर परिणाम होऊ शकतो. लवकरच आशिया चषक सुरू असून संभाव्या 11 खेळाडूंमधील मोसादेक भक्कम दावेदार आहे. मोसादेकने बांगलादेशकडून आतापर्यंत 21 एक दिवसीय, 8 टी-20 आणि 2 कसोटी सामने खेळले आहेत.




























































