‘या’ ठिकाणी तापमान पोहचते 70 अंशावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशभरात सध्या उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात पारा 45 अंशापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यानंतर नागरिक घराबाहेर पडत नाहीत. मात्र, जगभरात अशीही एक जागा आहे, जिथे तापमानाचा पारा 70 अंशावर पोहचतो. त्याचबरोबर जगभरात पारा 50 अंशावर पोहोचणारी काही ठिकाणे आहेत.

इराणमधील दश्त ए लुत हे ठिकाण जगातील सर्वात उष्ण ठिकाण मानले जाते. नासाने 2005 मध्ये या ठिकाणी 70.7 अंश तापमानाची नोंद केली होती. त्याचबरोबर 2004, 2007 आणि 2009 मध्ये जगातील सर्वात उष्ण ठिकाण म्हणून या जागेची नोंद झाली आहे. जगातील सर्वात उष्ण ठिकाण असण्यासह जगातील सर्वात कोरडे ठिकाण म्हणूनही या जोगची नोंद झाली आहे. या भागात पाऊस अत्यल्प पडतो. तसेच येथे पाण्याचा कोणताही स्रोत नाही. चिलीतील अटाकामा वाळवंटही जगातील सर्वात कोरडे आणि शुष्क ठिकाण आहे.

अमेरिकेतील डेथ व्हॅलीमध्ये सरासरी 5 सेंटीमीटर पाऊस पडतो. या ठिकाणीही पाण्याचा कोणताही स्रोत नाही. येथील भूजलतील पाणीही खारे आहे. 1913 मध्ये या भागात जगातील सर्वाधीक तापमानाची नोंद झाली होती. या ठिकाणी 56.7 अंश सेल्सिअस सरासरी तापमान असते. त्यामुळे जगातील या भागाचा समावेश सर्वात उष्ण ठिकाणांमध्ये झाला आहे. कॅलिफोर्नियाजवळच्या या भागात किमान तापमान 47 अंश असते. सुदानच्या नूबिया तलावाजवळील मदी हाल्फा शहरातही नगण्य पाऊस पडतो. जून महिना येथील सर्वात उष्ण महिना असतो. येथे सरासरी तापमान 41 अंशावर असते. 1967 मध्ये या शहरात 53 अंश एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. लिबीयाची राजधानी त्रिपोलीपासून 25 किलोमीटरवर असलेल्या अजीजियाह ही जागाही जगातील सर्वात उष्ण ठिकाण मानली जाते. 1922 मध्ये येथे सर्वाधिक 58 अंश तापमाची नोंद झाली होती. येथे सरासरी तापमान 48 अंशापर्यंत असते.