
आई आणि तिच्या दोन मुली एकाच वेळी त्रिपुरा माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. शिक्षण मंडळाने नुकताच यंदाच्या 10 वी व 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये 53 वर्षीय शीला राणी दास या दहावी व त्यांच्या दोन मुली बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या घरातील आनंद तिपटीने वाढला.
त्रिपुरातील शीला राणी दास यांचे खूप कमी वयात लग्न झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर मुलींना मोठे करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. शीला यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. मात्र, त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. शीला यांच्या मुली मोठय़ा झाल्यावर त्यांनी आईला दहावीची परीक्षा द्यायचा आग्रह केला. शीला यांनी मुलींसोबत परीक्षेचा अभ्यास सुरू केला. काही अडले की, मुली त्यांना समजावून सांगत. शीला या आगरतळा येथील अभयनगर स्मृती विद्यालयात शिकत होत्या.
मुलींनी केली मदत
शीला राणी दास यांची मुलगी जयश्री यंदा 12 वी उत्तीर्ण झाली. आईच्या यशाबद्दल ती म्हणाली, आई दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली याचा खूप आनंद वाटत आहे. मुळात तिला शिक्षणाची आवड होती. आम्ही तिला अभ्यासात मदत केली. तिने जिद्दीने परीक्षा देऊन यश मिळवले.
























































