नवजात मुलीला खाली फेकणाऱ्या आईविरोधात गुन्हा दाखल

557
crime

कौटुंबिक वादातून नवजात मुलीला 17 व्या मजल्यावरून खाली फेकणाऱ्या आईविरोधात कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून सुट्टी मिळल्यानंतर तिला अटक केली जाणार आहे.

कांदिवली पश्चिमच्या लालजी पाडा येथे एसआरएची इमारत आहे. त्या इमारतीच्या 17 व्या मजल्यावर एक कुटुंब राहते. घरखर्चावरून नवरा-बायकोमध्ये वाद होत होते. गुरुवारी दुपारी एका महिलेची घरीच प्रसूती झाली. तिने टोकाचे पाऊल उचलून प्रथम नवजात मुलीची नाळ कापली. त्यानंतर बाथरूममधून मुलीला खाली डकमध्ये फेकले. हा प्रकार सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आला. त्याने याची माहिती कांदिवली पोलिसांना कळवली. काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी जखमी अवस्थेत मुलीला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. कांदिवली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. नेमके कोणत्या मजल्यावरून मुलीला खाली फेकले असावे याचा अंदाज बांधत पोलीस 17 व्या मजल्यापर्यंत पोहचले. चौकशीदरम्यान एका महिलेने मुलीला खाली फेकल्याचे उघड झाले. तिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आपली प्रतिक्रिया द्या