
पैसे देण्याच्या कारणावरुन मुलीला जाळून मारणाऱ्या आई, बहीण तसेच भावजयीला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना तुळजापूर तालुक्यात ढेकरी येथे मे 2016 मध्ये घडली होती.
तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथे 24 मे 2016 रोजी ममता नाना पवार यांना पैसे देण्याच्या कारणावरून त्यांची आई सुलाबाई हनुमंत काळे, बहिण महादेवी नंदू शिंदे तसेच भावजयी वैशाली ज्ञानेश्वर काळे यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले होते. यात त्या गंभीर भाजल्यामुळे त्यांच्या पतीने उपचारासाठी तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. 26 मे रोजी ममता यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबाच्या आधारे तुळजापूर पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या महिलेचा उपचारादरम्यान 27 मे 2016 रोजी पुणे येथील ससून रुग्णालयात मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. ए. भंडारी यांनी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी जळीत महिलेचा मृत्युपूर्व जबाब विचारात घेत तसेच सरकार पक्षाच्यावतीने अॅड. पंडित जाधव यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तसेच पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.




























































