Movie Review – सद्भावनेचा संदेश देणारं मनोरंजन ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’

>> रश्मी पाटकर 

हिंदुस्थानी संस्कृती ही विविधांगी आहे. तिचे विभिन्न पैलू आहेत. त्याचा गाभा ज्या काही मूलभूत गोष्टींवर आधारलेला आहे, त्यातील एक म्हणजे इथली कुटुंबसंस्था. विविध नाती, त्यांची बहुरंगी-बहुढंगी वीण या संस्थेला समृद्ध बनवतात. आपल्याकडच्या संतपरंपरेने याच कुटुंबसंस्थेला एक विशाल आयाम देत विश्वबंधुत्वाचा संदेश दिला आहे. पण, सध्याच्या काळात बदललेले नातेसंबंध, सामाजिक-राजकीय स्थिती यांचा थेट परिणाम या बंधुत्वावर, सद्भावनेवर होताना दिसत आहे. आपल्या धार्मिक-जातीय भावना एकिकडे प्रचंड तीव्र आणि धारदार झालेल्या आहेत. त्याची परिणती ही धार्मिक द्वेषात होताना दिसत आहे. याच समस्येवर ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा चित्रपट हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य करतो.

गोष्ट सुरू होते ती बलरामपूर इथल्या त्रिपाठी कुटुंबापासून. दोन भाऊ, त्यांची एक बहिण आणि त्यांची मुलं असा मोठा परिवार असलेल्या कुटुंबाचे प्रमुख (कुमुद मिश्रा) आणि त्यांचा मुलगा वेदव्यास त्रिपाठी उर्फ भजन कुमार (विकी कौशल) यांची ही कथा आहे. आपल्या कुटुंबाला आपला शत्रु समजणारा वेदव्यास एक दिवशी एका मजेशीर प्रसंगातून भजन गाऊ लागतो आणि भजन कुमार म्हणून प्रसिद्ध होतो. लोकांकडून भजनं गायची आमंत्रण येऊ लागतात आणि त्याची प्रसिद्धी वाढत जाते. एके दिवशी मात्र या त्रिपाठी कुटुंबाकडे एक पत्र येतं. त्यात या कुटुंबाविषयीचं एक रहस्य उलगडून सांगितलेलं असतं. ते रहस्य कळल्यानंतर त्रिपाठी कुटुंबात भूकंप येतो. काय असतं ते रहस्य, त्याचा या कुटुंबाशी आणि चित्रपटाच्या थीमशी काय संबंध आहे, या चित्रपटाचं नाव द ग्रेट इंडियन फॅमिली असं ठेवण्यामागे काय काय दडलं आहे, ते मात्र या चित्रपटातच पाहावं लागेल.

चित्रपटाची संहिता ही तशी घासून गुळगुळीत झालेली असली तरी हलकीफुलकी गंमतीदार पटकथा त्यात रंगत आणते. एक कुटुंब, त्यातील मंडळींचे स्वभाव, एकमेकांशी असलेले नातेसंबंध यांचं दर्शन या कथेत देण्यात आलं आहे. या कथेला एक धार्मिक जिज्ञासेचीही किनार आहे. पण, तिची मांडणी थोडी अजून फुलवता आली असती तर पटकथा अजून रंजक झाली असती, असं वाटत राहतं. काही प्रसंग मजेशीर असूनही वाया गेले आहेत. ते वसूल करता आले असते. तिथे दिग्दर्शक कमी पडला आहे.

अभिनयाचीही तीच बाब आहे. अभिनेता विकी कौशल आणि कुमुद मिश्रा हे दोघंही कसलेले अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावरचे प्रसंग छान उठावदार झाले आहेत. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिला आता थोडा थोडा अभिनय जमू लागला आहे. पण तिने त्यावर अजूनही मेहनत घेण्याची गरज जाणवत राहते. विकी आणि कुमुद यांच्या तुलनेने इतर कलाकार कमी पडले असले तरी त्यांचं काम चोख झालं आहे. तांत्रिक बाबी आणि गाणीही ठीकठाक आहेत.

सध्या अॅप्लिकेशनच्या एका क्लिकने अपडेट व्हायच्या जगात आपण भावनांना विसरत चाललो आहोत. हातातलं सोशल मीडियाचं जग मनात उगाचच विषही पेरत जातं, त्याचा योग्य वापर भावनांच्या या विध्वसांला आळा घालू शकतो, हेही या चित्रपटातून अधोरेखित होतं.

दर्जा – ***