
>> रश्मी पाटकर
छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम मराठी जनांचं आणि मनाचं स्फूर्तिस्थान. त्यांच्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला तितक्याच भक्कमपणे पुढे नेलं ते त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी. एकाच वेळी अनेक शाह्यांशी आणि सत्तांशी या नरशार्दुलाने दिलेली झुंज आणि फितुरीच्या शापामुळे द्यावं लागलेलं बलिदान ही माती कधीच विसरू शकत नाही. त्याच शौर्यगाथेला पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न शिवरायांचा छावा या चित्रपटातून करण्यात आला आहे.
हा संपूर्ण चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पहिल्या भागात छत्रपती संभाजीराजे यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग आणि त्यांनी दाखवलेली राजकीय कर्तबगारी यांचं चित्रण करण्यात आलं आहे. चित्रपट दोन टप्प्यांत विस्तारतो. त्यातला पहिला टप्पा संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून सुरू होतो तर दुसऱ्या टप्प्यात बुऱ्हाणपूरची लढाई दाखवण्यात आली आहे.
पटकथेचा विचार करायचा झाला तर मध्यंतरापूर्वीचा टप्पा हा अतिशय विस्कळीत आहे. वास्तविक शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची स्थिती दोलायमान होऊ शकत होती. मात्र, काही निष्ठावान प्रधानांमुळे आणि त्यांना साथ देणाऱ्या मावळ्यांमुळे संभाजी महाराज हे छत्रपती झाले. आपल्याच लोकांनी दिलेला दगा आणि त्यावर महाराजांनी मिळवलेला विजय हा एक निर्णायक टप्पा होता. मात्र, तो या चित्रपटातून वगळल्याने थेट संभाजी महाराज आपल्याला दुसरे छत्रपती म्हणून दिसतात. त्यामुळे त्यांची भूमिका मनावर हवी तशी ठसत नाही. तसंच, या टप्प्यात महाराजांना साथ देणारे त्यांचे साथीदार, स्वराज्याची विस्कळीत झालेली घडी यांचं चित्रण येतं, त्यामुळे चित्रपट पकड सोडतो.
सुदैवाने, मध्यंतरानंतर पटकथा वेगाने पुढे सरकते. बुऱ्हाणपूरच्या लुटीचा प्रसंग, त्याची पूर्वयोजना, त्यासाठी आखलेले बेत, शह-काटशह यांमुळे पटकथेला रंगत चढली आहे. त्यामुळे प्रेक्षक या भागात गुंतून राहतो. अभिनयाबाबत बोलायचं झालं तर भूषण पाटील आणि तृप्ती तोरडमल यांनी संभाजी महाराज आणि येसूबाई राणीसाहेबांच्या भूमिका साकारल्या आहेत. सुरुवातीला दोघंही आपल्या भूमिकांत चाचपडल्यासारखे वाटतात. पण, नंतर नंतर त्यांना सूर सापडला आहे. प्रसन्न केतकर, राहुल देव, समीर धर्माधिकारी, ईशा केसकर इत्यादी कलाकारांनी आपापल्या भूमिका चांगल्या वठवल्या आहेत. चित्रपटाचे संवादही ठिकठाक आहेत. इतर तांत्रिक बाजू अजून उत्तम हव्या होत्या, असं वाटत राहतं.
अर्थात हा पहिला भाग आहे. संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा एका भागात मांडणं अशक्य आहे. त्यामुळे ही तर फक्त झलक असल्याचं हा चित्रपट दाखवून देतो. बुधभूषणसारखा संस्कृत ग्रंथ लिहिणारा भाषापंडित, स्वराज्य राखण्यासाठी येसूबाईसाहेबांना प्रशासकीय निर्णयांसाठी स्वतंत्र शिक्का-कट्यार देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा द्रष्टा राज्यकर्ते, एकाच वेळी पाच शाह्यांशी एकहाती लढत देणारा पराक्रमी योद्धा आणि धर्मासाठी निधड्या छातीने सामोरा गेलेल्या शिवरायांच्या या छाव्याची ही गाथा पाहण्यासारखी आहे हे निश्चित.
























































