राज्यपालांना हटवा, अन्यथा जोडे काय असतात, ते कसे मारतात हे शिवसेना दाखवेल, खासदार संजय राऊत यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱया राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडून अधिकृतपणे केली पाहिजे. दळभद्री राज्यपालांना हटवा, अन्यथा जोडे काय असतात आणि ते कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

छत्रपतींबाबत राज्यपाल कोश्यारींनी पुन्हा एकदा दळभद्री विधान केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान करत महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आहे. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीदेखील वादग्रस्त विधान केले. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली असे त्रिवेदी यांनी विधान केले आहे, हे भाजपला मान्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी माफी मागितली? हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले पाहिजे. कारण ते भाजपचे सहयोगी आहेत, मुख्यमंत्री आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

वीर सावरकरांबद्दल रस्त्यावर उतरले होते, जोडे मारले होते, स्वागत आहे. आता हे जोडे कोणाला मारणार आहात? भाजपच्या प्रवक्त्यांना की राज्यपालांना? मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात जोडे मारो आंदोलन करणाऱया भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी तेच जोडे जमा करून ते राजभवनात नेले पाहिजेत, असे संजय राऊत म्हणाले.

आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान?

छत्रपतींनी माफी मागितली तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत जयजयकार का करतात? नौसेनेचे बोधचिन्ह दिलेय तर ते का दिले आहे? औरंगजेब आणि अफजलखानाच्या कबरी फोडण्याची नाटकं का करत आहात तुम्ही? स्वाभिमानाचे तुणतुणे वाजवत भाजपबरोबर गेलात ना? आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? आम्ही मविआत गेलो आणि स्वाभिमान दुखावला म्हणून तुम्ही भाजपबरोबर गेलात. मुख्यमंत्री आणि 40 आमदार साधा निषेधही व्यक्त करू शकले नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता. भाजपने आणि त्यांच्या राज्यपालांनी अधिकृतपणे शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटले. तरीही तुम्ही सत्तेला चिकटून बसलेला आहात. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.