सरसकट कर्जमाफीचे आश्वासन हवेत! खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले ‘सरसकट कर्जमाफी’चे आश्वासन अद्यापि पूर्ण न झाल्याने ‘यही समय है, सही समय है’ ही टॅगलाईन नेमकी कधी प्रत्यक्षात उतरणार, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. राज्यात वाढत्या शेतकरी, शिक्षक तसेच जलजीवन मिशनच्या कर्मचाऱयांच्या आत्महत्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कराडमध्ये सरकारवर टीका केली.

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील समाधीस्थळी अभिवादन केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजीमंत्री बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत खासदार सुळे म्हणाल्या, ज्यांनी कोणत्यातरी पित्याची व महाराष्ट्रातील लेकीची क्रूर हत्या केली, अशांना फाशीची शिक्षा होणे आवश्यक आहे. अशा लोकांची ‘आठवण’ काढणाऱया कोणत्याही नेत्याचा तीव्र निषेध व्हायलाच हवा. अशा प्रवृत्तीला आश्रय देणाऱयांना त्यांच्या पक्षातूनही हाकलून देण्याची मागणी त्यांनी केली.

तिजोरी जनतेची आणि मालकही जनताच

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील ‘निधी कोणाकडे’ या विधानांवर प्रतिक्रिया देताना सुपिया सुळे म्हणाल्या, राज्याची तिजोरी ही जनतेची आहे. पैसाही जनतेचा असून, त्याचे मालकही जनताच आहे.