आधी लगीन एमपीएससीचे, परीक्षेसाठी विवाह सोहळा तीन तास पुढे ढकलला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमुळे एका नवरदेवाला आपला लग्न सोहळा तीन तास पुढे ढकलावा लागला आहे. सुसारवाडी येथील चंद्रकला आमले या तरुणीबरोबर केळेवाडी येथील तरुण नीलेश पोकळा हा आज दुपारी तीन वाजता विवाहबद्ध होणार होता. मात्र नीलेशची एमपीएससीची परीक्षा आजच असल्यामुळे हा विवाह सोहळा तीन तास उशिराने पार पडला. नीलेशने आधी लगीन एमपीएससीसी केले आणि नंतर तो चंद्रकलाशी लग्न करण्यासाठी बोहल्यावर चढला.

नीलेश आणि चंद्रकला यांच्या लग्नाची तारीख दोन महिन्यांपूर्वी ठरवण्यात आली होती. त्यावेळी एमपीएससीच्या परीक्षेची तारीख 12 मार्च होती. मात्र अचानक या वेळापत्रकात बदल करण्यात आला आणि एमपीएससी परीक्षेची तारीख 21 मार्च जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता काय करायचे हा प्रश्न नीलेशला पडला होता.

मात्र त्याने आज ठाणे येथील एका केंद्रावर प्रथम परीक्षा दिली आणि नंतर तीन तासांनी लग्न केले. नीलेश आणि त्याच्या नातेवाईकांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत केले जात आहे. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.