
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरिक्षक पदासाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव एक वर्षाची विशेष संधी देण्यात यावी, अशी मागणी राज्यशासनाकडे वयोधिक झालेल्या विद्यार्थ्यांकडून निवेदनाव्दारे केली जात आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ जाहिरात २९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वयो मर्यादा गणना दिनांक 1 नोव्हेंबर २०२५ अशी आहे. उपरोक्त जाहिरात येण्याससाठी ७ महिने उशिर झाला आहे. त्यातही वयोमर्यादा गणना पुढील तारीख नमूद केली आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी अपात्र ठरत आहेत.
मागील वर्षी संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ जाहिरात उशीरा आल्याने दि. २० डिसेंबर २०२४ नुसार १ वर्ष वय सवलत दिली होती. तसेच राज्यशासनाने २०२५ मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई पदासाठी वय सवलत दिली आहे. त्या अनुषंगाने अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी १ वर्ष वय सवलत मिळावी किंवा वयोमर्यादा गणना कालावधी तरी १ जानेवारी २०२५ गृहीत धरला जावा, जेणेकरुन सरसकट विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. तरी राज्यशासनाने याकडे गांभीयाने लक्ष देऊन एक वर्ष वयवाढ द्यावी अशी मागणी निवेदनाव्दारे केली जात आहे.





























































