
>> मृणाल घनकुटे
हिवाळा म्हणजे केसांसाठी सर्वात वाईट ऋतू! यात जास्त स्निग्ध, तेलकट, गळणारे, राठ आणि कोरडे अशा विविध प्रकारच्या केसांच्या समस्यांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये सगळय़ात भयंकर केसांतील कोंडा असतो. या समस्या हिवाळय़ात वारंवार होत असतात. कारण टाळू कोरडी आणि शुष्क असते. केसातील कोंडय़ापासून मुक्ती कशी मिळवायची याविषयी जाणून घेऊया.
द एस्थेटिक क्लिनिक्सच्या कॉस्मेटिक डर्माटोलॉजिस्ट डॉ. रिंकी कपूर यांनी केसातील कोंडय़ावर काही नैसर्गिक उपाय सांगितले आहेत. त्यांच्या मते, कोंडा तुमच्या केसांच्या आरोग्यावर आणि मनोबलावरही परिणाम करू शकतो. डॅन्ड्रफचे वैद्यकीय नाव सेबोरिया आहे आणि ते टाळूला नुकसान पोहोचवू शकते व केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते.
खोबरेल तेल आणि लिंबू
लिंबातील सायट्रिक ऑसिड टाळू स्वच्छ करते आणि खोबरेल तेल त्याचे पोषण करते. हे दोन घटक एकत्रितपणे कोंडा टाळण्यास आणि दूर करण्यास मदत करतात. डॉ. रिंकी कपूर म्हणतात, ‘हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे आणि तो अनियमित ब्रश किंवा केस धुणे, तणाव, चुकीचा शॅम्पू किंवा शॅम्पू न वापरल्यामुळेदेखील होऊ शकतो. हिवाळय़ात कोंडा वाढतो, कारण त्वचेचे पीएच संतुलनाबाहेर जाते आणि त्वचा कोरडी होते.’ खोबरेल तेल आणि लिंबू यांचा समप्रमाणात करावा. फक्त 2 चमचे कोमट खोबरेल तेलात समान प्रमाणात लिंबाचा रस मिसळणे आवश्यक आहे. शॅम्पू करण्यापूर्वी 20 मिनिटे आधी टाळूवर हलक्या हाताने मसाज करा.
बदाम तेल आणि टी ट्री ऑईल
टी ट्री ऑईलमध्ये अँटीफंगल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. घरगुती उपचार करण्यासाठी हा एक सर्वोत्तम उपाय आहे. टी ट्रीच्या मदतीने तुमच्या केसात जमा झालेली धूळ, माती पूर्णपणे स्वच्छ होऊ शकते. दुसरीकडे बदामाचे तेल बुरशी आणि यीस्टचे संतुलन राखण्यास मदत करते. टी ट्री ऑईलचे दोन थेंब 50 मिली बदाम तेलात मिसळा आणि टाळूवर हळूवारपणे मालिश करा. 30 मिनिटांनंतर सामान्य शॅम्पूने केस धुवा.
कोरफड आणि कडुलिंब
दोन्हींमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे उत्कृष्ट पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत. ते केसातील कोंडा कमी करण्यासाठी उत्कृष्ट संयोजन करतात, कारण ते सुखदायक आणि थंड गुणधर्मांसह येतात. 2 चमचे कोरफड जेल 10-15 ताज्या कडुलिंबाच्या पानांमध्ये मिसळा. हे गुळगुळीत मिश्रण आपल्या केसांवर 30 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर अँटी डँड्रफ शॅम्पूने केस धुवा.
केळी, लिंबू आणि मध – मुखवटी
हे तीन घटक केवळ कोंडाच नाही, तर केसांना मॉइश्चरायझ करतात आणि डोक्याची त्वचा स्वच्छ करतात. याचा वापर कसा करावा ते येथे आहे. एक केळी मॅश करा, लिंबूचे काही थेंब आणि एक चमचा मध घालून मुखवटी बनवा. केसांना लावा आणि 30 मिनिटांनंतर केस धुवा.
हिवाळय़ातही आठवडय़ातून दोनदा केसांना ब्रश आणि शॅम्पू करा. जर कोंडा खूप तीव्र असेल, तर त्वरित उपचारांसाठी त्वचारोग तज्ञांचा सल्ला घेणे चांगले.
सफरचंद सायडर व्हिनेगर (एसीव्ही) सह मेथी हेअर मास्क
मेथीमध्ये निकोटीनिक ऑसिड आणि माफक प्रथिने असतात, जे डोक्यातील कोंडा प्रतिबंधित करते आणि टाळूचे पोषण करते. त्यामुळे केसांच्या वाढीलाही चालना मिळते. दुसरीकडे एसीव्ही डोक्यातील कोंडा नियंत्रित करते आणि केस मजबूत करून टाळूची पीएच पातळी संतुलित करते.
सुमारे 2 चमचे मेथीची पाने किंवा बिया रात्रभर भिजवा आणि सकाळी बारीक करा. अर्धा टीस्पून सफरचंद सायडर व्हिनेगर घाला आणि चांगले मिसळा. केसांवर लावा आणि अर्धा तासाने चांगल्या अँटी-डँड्रफ शॅम्पूने केस धुवा व नंतर पंडिशनर लावायला विसरू नका.




























































