धोनीनं दिला नवख्या क्रिकेटपटूंना कानमंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी, अशी प्रत्येक खेळाडूंची इच्छा असते. यासाठी खेळाडू आधुनिक सुविधायुक्त क्रिकेटचे धडे देणाऱ्या अकादमीत प्रवेशही घेतात. परंतु, क्रिकेट खेळात प्रगतीसाठी सर्वच कौशल्य गंभीरतेने आत्मसात करणे आवश्यक आहे. यासाठी खेळाडूंनी फक्त खेळावरच लक्ष केंद्रीत करावे, असा मोलाचा सल्ला माजी कर्णधार, यशस्वी फलंदाज व यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटपटूंना दिला. वर्धा मार्गावरील धुटी गावातील गायकवाड-पाटील इंटरनॅशनल स्कूल परिसरातील अद्ययावत निवासी क्रिकेट अकादमीच्या उद्घाटन समारंभात तो बोलत होता.

धोनी म्हणाला, खेळात भरारी घेणे सहज नाही. खेळात यश व अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु, याचा विचार न करता जो खेळाडू मेहनत कायम ठेवणार तोच यशाचे शिखर गाठण्यात यशस्वी ठरतो. शिक्षणाला महत्त्व देणे काळाची गरज आहे. मात्र, आजची जीवनशैली बघता खेळही महत्त्वाचा घटक बनला आहे. स्पोर्ट्समुळे मुलांमध्ये अमुलाग्र बदल घडतात.नवीन आव्हान पेलण्याची क्षमता खेळातूनच मिळते. स्पर्धेमध्ये निकाल लगेच लागतो. तुम्ही विजय प्राप्त करता किंवा पराभूत होता. मात्र, या दोन्ही निकालातून खेळाडूंना शिक्षणच मिळते. पराभूत झाल्यास पुन्हा पुनरागमन करण्याच्या प्रयत्नाला तुम्ही लागता आणि कुठे कमी पडलो याचाही शोध घेता. विजयी झाल्यास पुन्हा विजय नोंदविण्याची इच्छा तुमच्यात निर्माण होते. यातून खेळाडू रणनितीची रचना आणि चुका टाळणे, हेच शिकतो आणि त्याचा भविष्यात फायदाच होतो. लहान मुलांच्या प्रगतीसाठी पालकांची विचारसरणी महत्त्वाची असते. मुलांमधील कला आणि त्याला कशाबद्दल आवड आहे, हे लक्षात घेऊन पालकांनी मुलांना प्रोत्साहित केले तर निश्चितच चिमुकलेही उत्साहाने प्रतिसाद देतील.

नागपुरातील गोड आठवणींना उजाळा देत धोनी म्हणाला, माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीत नागपुरचे विशेष स्थान आहे. रेल्वेचे प्रतिनिधित्व करताना स्थानिक मैदानावर अनेक सामने खेळलो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपदही मला नागपुरातच मिळाले. त्यामुळे माझे आणि नागपूरचे अतुट नाते आहे. नागपूर शहरातून नवीन खेळाडू घडावे, याच उद्देशाने देशातील पहिली निवासी क्रिकेट अकादमी नागपूर येथे सुरु केली, असेही धोनी म्हणाला.

‘कूल’ म्हणून ओखळल्या जाणाऱ्या धोनीने कार्यक्रमात क्रिकेटपटूंच्या प्रश्नांना शांत शैलीतच युवा क्रिकेटपटूंच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. प्रवीणसिंग राजपूतने २००७ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात जोगिंदर शर्मा या गोलदांजाला अखेरचा षटक का दिला, असा प्रश्न विचारला. मात्र, धोनीने ‘आप बताओ किसके ओव्हर्स बाकी थे’ असा प्रश्न विचारून प्रश्न करणाऱ्याची फिरकी घेतली. यानंतर धोनीने शर्मालाच का शेवटचे षटक दिले याची वास्तविकताही स्पष्ट केली. कर्णधार असूनही इतके कुल कसे आहात, असे विचारले असता धोनीने ‘मै रेफ्रीजरेटर में सो के आता हू’ असे मजेशीर उत्तर दिले. परंतु, लगेच कुठल्याही परिस्थितीचा सामना करताना स्वतावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. खेळात हे महत्त्वाचे असते. त्यातून तुमच्या व्यक्तीमत्वाचा विकास घडलो, असेही धोनीने स्पष्टे केले. 2011च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत वरच्या क्रमांकावर खेळायला येण्यामागची भूमिकाही धोनीने एका प्रशाला उत्तर देताना समजावून सांगितले.