जेट कर्मचाऱयांना ‘विस्तारा’चा मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी। मुंबई

दिवाळखोरीत निघालेल्या जेट एअरवेजच्या बेकार कर्मचाऱयांना टाटांच्या एअर विस्ताराने काहीसा दिलासा दिला आहे. नोकरी गेलेल्या जेटच्या 550 कर्मचाऱयांना आपल्या सेवेत सामील करून घेतले आहे. यापूर्वी स्पाइसजेटनेही जेटच्या कर्मचाऱयांना नोकरी देऊ केली आहे.

विस्ताराने सामावून घेतलेल्या 550 कर्मचाऱयांमध्ये 100 वैमानिकांचाही समावेश आहे. लवकरच एअर विस्तारा आणि एअर एशिया जेटची विमाने आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेणार आहेत. दरम्यान, जेट एअरवेजने आपल्या सर्व कर्मचाऱयांसाठीची मंगळवारपासून मेडिक्लेमची सुविधाही बंद केली आहे.

जेट व्यवस्थापनाचा आशावादी दृष्टिकोन अद्यापही कायम आहे. यासाठी आम्ही अजूनही योग्य संधीची वाट पाहत आहोत. कर्ज देणाऱयांशी अद्यापही चर्चा सुरू आहे. बोली प्रक्रियेत आमचा त्यांना पाठिंबा आहे. असे जेट एअरवेजचे मुख्य लेखा अधिकारी, राहुल तनेजा यांनी म्हटले आहे.

एअर विस्तारा, गो एअरही मदतीला धावल्या

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर विस्ताराने जेट एअरवेजच्या 450 केबिन क्रू कर्मचाऱयांना आपल्याकडे नोकरी दिली आहे. त्याचबरोबर एअर इंडिया, स्पाइसजेट, गो एअर या विमान कंपन्याही जेटच्या कर्मचाऱयांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. एअर एशिया जेटचे बोइंग 737 आपल्या ताफ्यात सामावून घेणार आहे.